लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील | अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना २ वाजेपर्यंत परवानगी

445
लातूर

लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या घटल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आठवड्यातील पाच दिवस उघडे ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बीअर बार यांना फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सदर माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांना दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामध्ये कापड, फुटवेअर, ज्वेलरी, भुसार आदी दुकानांचा समावेश आहे. मोठ्या मॉलमधील शॉपर दुकान बंद असतील.

कृषी सेवा देणारे सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतील. शिवाय, कृषी सेवा देणाऱ्या दुकानांची मालवाहतुकीलाही निर्बंध राहणार नाहीत.

विवाह सोहळ्यांसाठी संख्येची मर्यादा

नियोजित विवाह सोहळे स्वगृही करता येतील. मात्र त्यासाठी संख्येची मर्यादा असेल. २५ लोकांच्या आणि दोन तासांच्या वेळेत विवाह सोहळे उरकावे लागतील.

सरकारी कार्यालयांत २५ टक्के उपस्थिती सरकारी कार्यालयांत पूर्वी १५ टक्के उपस्थिती होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून, २५ टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहता येईल. २ वाजेनंतर वैद्यकीय सेवा वगळता अन्य आस्थापाने कडकडीत बंद राहतील.

विकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार

आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सर्वप्रकारच्या दुकानांना दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार, रविवार मात्र कडक लॉकडाऊन असेल.

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता आठवड्यातील दोन दिवस कडकडीत बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही निर्बंधाबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here