नागपूर : फेसबुकवर ओळख, त्यातून मैत्री व त्यानंतर शरीरसंबंध प्रस्थापित करताना व्हिडिओ तयार करून विवाहितेला ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यश नेमादे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रार करणारी महिला गड्डीगोदाम भागात राहते. ती विवाहित असून आरोपी अविवाहित आहे. तिची आणि आरोपी यश नेमादेची गेल्या वर्षी फेसबूकवर ओळख झाली.
तिथून मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपली पर्सनल माहिती आणि मोबाइल नंबरही एक्स्चेंज केले. नंतर ते सलग संपर्कात राहू लागले. भेटीगाठीही वाढल्यानंतर शरीर संबंधाची ओढ वाढू लागली.
त्यांच्या एकांतवासात भेटी होऊ लागल्याने त्यांची जवळीक जास्तच वाढली. यातून त्यांनी एक दिवस सीताबर्डीतील एका लॉजवर शरीरसंबंध प्रस्थापित केले.
यावेळी नेमादेने त्याच्या मोबाइलमध्ये शरीरसंबंधाचा व्हिडिओ तयार केला. दुसऱ्यांदा त्याने अश्लील फोटो काढले. दरम्यान काही दिवसानंतर त्यांच्या संबंधातील गोडवा संपला.
त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. तो तिला अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू केल्याने ती हादरली. तिने काही दिवस विचारविमर्श केल्यानंतर शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले.
नेमादेने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात नोंदवली. प्रकरण तपासल्यानंतर ठाणेदार अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर यांनी आरोपी नेमादे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला, पोलीस पुढील तपास सुरू आहे.