पिंपरी : प्रेम त्रिकोण म्हटले कि गुन्हा हा निश्चित घडतोच. प्रेमात घडणारा गुन्हा एवढा भयंकर असतो कि त्यात तीन आयुष्यचं नाही तर तीन कुटुंब उध्वस्त होतात.
सांगवी येथील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दि. ९ जानेवारी रोजी ही घटना घडली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आनंद यांच्या पत्नीचे लग्नापूर्वी आरोपी जसप्रितसिंग याच्याशी प्रेमसंबंध होते.
मात्र, जसप्रितिसिंग हा विवाहित असून त्यांचा धर्म वेगळा असल्याने ते लग्न करू शकले नाही. त्यामुळे त्याच्या प्रेयसीने आनंद यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
त्यास जसप्रितसिंग यानेही परवानगी दिली. तसेच लग्नापूर्वी आनंद यांच्या पत्नीनेही आपल्या प्रेमप्रकरणाबाबत त्यांना सांगितले होते.
जसप्रितसिंग अमरजितसिंग सत्याल (३०, रा. औरंगाबाद), आनंद ऊर्फ दादुस मोहन इंगळे (२७, रा. उल्हासनगर) आणि सुनील हिवाळे (रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आनंद सोळंकी (रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
लग्नापूर्वीच आनंद यांना धमक्या देण्यात येत होत्या. मात्र, त्यांने त्याकडे दुर्लक्ष केले. लग्न करून ते दोघेजण औरंगाबादहून पुण्याला येत असताना जेवण्यासाठी एका हॉटेलवर थांबले होते.
तेव्हा काही जणांनी त्यांना भेटून आम्ही तुमचा पाठलाग करीत असल्याचे सांगत जपून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच दिवाळीच्या सणावरून परत पुण्याला येत असतानाही त्यांच्या गाडीचा ६० किलोमीटर पाठलाग झाला होता.
लग्नानंतर आनंद यांच्या पत्नीने दोन मोबाइल क्रमांक बदलले. मात्र, तरीही जसप्रितसिंग हा पत्नीच्या भावाच्या मदतीने तिच्या संपर्कात होता.
आनंद यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांना जसप्रितसिंगची माहिती मिळाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी दादुस मोहन इंगळे आणि सुनील हिवाळे यांचे नाव पुढे आले.
पोलिसांनी जसप्रितसिंग याला ताब्यात घेतले असता त्यांनी सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे त्यांने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सुनील हिवाळे याला ताब्यात घेतल्याचे खोटेच सांगितले.
तेव्हा दादुस मोहन इंगळेने शरणागती पत्करली आणि झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. तेव्हा पोलिसही चक्रावून गेले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखली वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, राहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, प्रवीण पाटील, नितीन खोपकर, शशिकांत देवकांत, विजय मोरे, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
आरोपी सुनील हिवाळे याने रावळकर नावाच्या एका नागरिकांचा फोन घेऊन त्यावरून आनंद यांना धमकी दिली होती. आता पोलिसांनी रावळकर यांना साक्षीदार केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
तसेच, या प्रकरणाचा तपास अद्याप बाकी असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचेही सांगवी पोलिसांनी सांगितले आहे