प्रेयसीचे लग्न ठरल्याने बिथरलेल्या प्रियकराने तिच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडून स्वत:देखील आत्महत्या केली आहे.
मुंबईच्या मालाड भागात मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली होती. प्रेमसंबंधात आलेल्या तणावातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
मालाड पश्चिम येथील लिंक रोडवर हे हत्याकांड घडलं आहे. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मृत आरोपीचे नाव राहुल यादव आहे. तर मृत मुलीचे नाव निधी मिश्रा आहे.
राहुल कांदिवलीच्या लालजी पाड्यात राहत असून मृत मुलगी मालाड पूर्व कुरार विलेज येथे राहणारी होती. निधीचे लग्न ठरले होते. त्याबाबत राहुलला कळताच त्याचा राग अनावर झाला.
निधीला जाब विचारण्यासाठी त्याने तिला भेटायला बोलावले होते. भेटल्यानंतर या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर राहुलने खिशात ठेवलेल्या देशी कट्ट्याने निधीवर गोळी झाडली. नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
राहुलने देशी कट्टा आणि गोळ्या आणल्या कुठून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच आरोपी राहुल याच्या नावावर खंडणी आणि दरोड्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
अॅडीशनल सीपी दिलीप सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासाचा आढावा घेतला.