मुंबई : कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली.
त्यावेळी कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.
कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात 11.7 टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली.
त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून 31 लाख 23 हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
एपीएमसीच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 3700 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्यात एकूण 26 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, तर 12 धरणाच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पनाच्या विक्रीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी 2 हजार 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतमालाचा व्यवहार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगत अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, कृषी पंपाच्या सौर उर्जा जोडणीसाठी महावितरणाला 1500 कोटी देण्यात येणार आहेत.