Maharashtra Corona Lockdown | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता घोषणा करणार?

457

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज थोड्याच वेळात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात ते लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संबोधित करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री लॉकडाऊन संदर्भात राज्यातल्या जनतेशी बोलण्याची शक्यता आहे.

उद्या दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

याआधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाऊसंदर्भात निर्णय घेतील, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

अस्लम शेख यांनी आज (दि.13 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी लॉकडाऊनसंबंधी आजच मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं.

त्यांनी म्हटले, एसओपी बनवणे सुरू आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत अनेकांचे म्हणणे होते की, 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेणार. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे मत सर्वांचे आहे.

लॉकडाऊन कधी लागू करायचे याबाबत चर्चा सुरू होती पण रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने जास्त वेळ दवडण्यात अर्थ नाही असे सरकारचे मत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बैठका सुरू, घोषणा कधी?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही अशी चर्चा शनिवारी (दि.10 एप्रिल) रोजी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यातही चर्चा झाली.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊनची घोषणा कधी होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजारांच्या पटीत वाढत असल्यानं आणखी कडक निर्बंध लावण्यासाठी किंवा लॉकडाऊनचा पर्याय तपासण्यासाठी मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, या कडक निर्बंधांचा ते निर्णय कधी घेणार, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले, रुग्णसंख्या इतक्या वेगानं वाढतेय की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल. कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल, तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील.

टास्क फोर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठक

टास्क फोर्सच्या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते.

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर राजेश टोपे म्हणाले !

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (दि.11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

राजेश टोपे यांनी पुढे सांगितले की, या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत होते.

त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here