राज्यात करोना रुग्णसंख्येने यावर्षीचा उच्चांक गाठला आहे. 24 तासांत तब्बल 25 हजार 833 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे राज्याला पुन्हा एकदा लाॅकडाऊनचा पर्याय स्विकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचकभाष्य केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च आकडा गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लाॅकडाऊन करणे हा मार्ग आहे. लाॅकडाऊनचा पर्याय समोर दिसतो आहे.
मात्र, मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरू लागले आहेत.
परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता जो व्हायरस पसरतो आहे, तो नवा विषाणू आहे का याबाबत अद्याप तरी माहिती नाही’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाव्हायरस झपाट्याने पसरत आहे. दरोरज नवीन करोनाबाधितांची संख्या ही वाढतीच आहे. गुरूवारी एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद झाली आहे.
गुरूवारी तब्बल 25 हजार 833 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 58 जणांचा मृत्यू झाला तर 12 हजार 174 जणांनी या आजारावर मात केली.
सध्या राज्यात 8 लाख 13 हजार 211 व्यक्ती गृह अलगीकरणात आहेत, तर 7097 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
सध्या राज्यातील रुग्ण बरो होण्याचे प्रमाण 90.79 टक्के एवढे आहे. तसेच राज्यातील 134 खासगी रूग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती गुरूवारी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर व जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.
करोना वाढू लागल्याने कठोर निर्बंध घालण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
व्हीडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला आहे.
दरम्यान, 45 वर्षावरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
या सोबतचं लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवाणगीची मागणीही केंद्राकडे करण्यात आली आहे.