मुंबई : कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करत आहे. तोच पर्याय स्वीकारावा लागेल, उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता.
यावर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष टीका केली. आनंद महिंद्रा यांचे थेट नाव न घेता ‘सल्ला’ देण्याचा ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
काही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग? त्यासाठी डॉक्टर नकोत का? काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत.
त्यांना मी सांगतो, तुम्ही ५० डॉक्टर द्या, आपण तेही करू, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.
आनंद महिंद्रा काय म्हणाले होते ?
‘उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये/आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया’, असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
- सध्या मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडे आठ हजारांवर पोहोचली आहे.
- पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही
- राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार
- लॉकडाऊन करणार का? याचं उत्तर मी अजून देणार नाही
- रस्त्यांवर उतरा, पण नागरिकांच्या मदतीसाठी, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सात कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय
- कोरोना काळात राजकारण नको.
- सर्वपक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावं
- रुग्ण वाढ थांबवण्यासाठी सध्या कुठलाही उपाय नाही
- लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम
- अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात
- राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही.