Maharashtra Lockdown | राज्यात आठ दिवसांचा ‘कडक’ लॉकडाऊन होणार? जाणून घ्या नेमके कारण !

1036

मुंबई : राज्यात कडक संचारबंदी लागू करूनही कोरोना आटोक्यात आला नाही. या दरम्यान सात दिवसांत अडीच लाखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे.

राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्‍सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा, या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध विभागांना दिलेल्या सवलती बंद करण्यात येणार आहेत.

30 एप्रिलपूर्वी आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन बेडची कमतरता भासू लागली असून दुसरीकडे ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हीरचाही तुटवडा जाणवत आहे.

सध्या राज्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत गेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, रायगड, वसई विरार, नाशिक, नगर, जळगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, परभणी, लातूर, बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे.

राज्यातील वाढलेल्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ कमिटींची नियुक्‍ती करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्याकडून अहवाल मागविला जात आहे.

तत्पूर्वी, राज्यात कडक संचारबंदी करूनही बहुतेक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याची स्थिती पोलिस कारवाईतून समोर येत आहे.

त्यामुळे आणखी कडक पाऊल उचलण्याच्या अनुषंगाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची दोन तास बैठक घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, कडक संचारबंदीचा कालावधी 8 मेपर्यंत वाढविण्याचाही विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

यासंदर्भात आज (मंगळवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब होईल, अशीही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

कडक लॉकडाउन होणार?

कडक संचारबंदीनंतरही दररोज रुग्णसंख्या वाढतच असून मृत्यूचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. अजूनही लोकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे.

त्यामुळे परिस्थिती पाहून कडक लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव त्याबद्दल काही दिवसांत घोषणा करतील.

कडक लॉकडाउनची प्रमुख कारणे

  • दिवसेंदिवस वाढतेय मध्यम व तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या
  • कडक संचारबंदी असतानाही बेशिस्तीचे दर्शन; दररोज रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय
  • शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांसाठी वशिलेबाजी; सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी गुंतल्या खाटा
  • लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसही पुरेशा प्रमाणात मिळेना; रेमडेसिव्हीर, ऑक्‍सिजनचा जाणवू लागला तुटवडा
  • आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला; मागील सहा दिवसांत पावणेचार लाख रुग्ण वाढले तर दोन हजार 298 जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here