मुंबई : दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 25 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील.
माध्यमातून ओरड व पालकांच्या तक्रारीनंतर बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज 11 जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दहावी बोर्ड परिक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी चिंतेत होते.
अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी 10 वाजेपासून वेबसाईट हँग झाली होती. त्यात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणे कठीण झाले होते.
आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक ,मुंबई मुख्यध्यापक संघटना यांनी बोर्डाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
याबाबत बोर्डाने तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकर दूर केल्या जातील शिवाय मुदतवाढ बाबत अजून विचार झाला नसल्याचं सांगितलं होतं. याबाबत एबीपी माझानं सातत्यानं बाजू लावून धरली होती.