महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकली नाही | भाजपचा हल्लाबोल

197

महाविकास आघाडीच्या पराभवाचा धागा पकडून भाजपकडून जोरदार हल्ला केला जात आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. महाविकास आघाडीची याठिकाणी ११५ मतं फुटल्याचं समोर आले. महाविकास आघाडीच्या या पराभवावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. 

“धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मत राखू शकली नाहीत. यावरुन उद्याचे महाविकास आघाडीचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होते”, असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी भाजपचे विजयी उमेदवार अमरिश पटेल यांचे अभिनंदन देखील केले. 

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. निवडणुकीत भाजपकडे १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. तरीही भाजपचे उमेदवार अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीला मात दिली आहे. अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं पडली. त्यामुळे क्रॉसवोटिंग झाल्याने निष्पन्न झाले आहे.

महाविकास आघाडीच्या याच पराभवाचा धागा पकडून भाजपकडून जोरदार हल्ला केला जात आहे. धुळे-नंदुरबार प्रमाणेच इतर मतदार संघातही भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन आता महाविकास आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here