नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे.
या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि शिवसेनेच्या संबंधांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सचिन वाझे आणि परमबीर सिंह ही केवळ ‘छोटी प्यादी’ आहेत. त्यांचा राजकीय ‘वजीर’ कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
ख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणात सचिन वाझेंना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
काही वेळ त्यांनी शिवसेनेचे प्रवक्तेपददेखील सांभाळले. २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी वाझेंना सेवेत घेण्यासाठी फोन केला होता.
शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी माझी भेटदेखील घेतली होती. वाझेंना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला.
मात्र गंभीर आरोपांखाली निलंबन झाल्याने मी त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ४ महिने वाझेच वापरत होते. ही गाडी मनसुख हिरेन यांचीच होती. गाडी चोरीला गेल्याचा बनावदेखील वाझे यांनीच रचला.
मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी असतानाही एपीआय दर्जाच्या वाझेंकडे स्फोटक प्रकरणाचा तपास सोपवला गेला.
हिरेन यांची चौकशीदेखील त्यांनीच केली. पुढे याच हिरेन यांचा खून झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडून झालेला नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी आढळून आलेले नाही. त्यांच्या तोंडाजवळ रुमाल आढळून आले. श्वास कोंडला गेल्याने मनसुख यांचा मृत्यू झाला.
मात्र त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला.
मात्र मृतदेह पाण्यात टाकणाऱ्यांचा अंदाज अर्ध्या तासाने चुकला. त्यांनी भरतीऐवजी ओहोटी असताना मृतदेह टाकून दिला. तो वाळूत रुतून बसला, असे फडणवीस यांनी सांगितले.