Maratha Reservation | मराठ्यांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे? मराठा व कुणबी यामध्ये काही फरक आहे का?

801
maratha aarkshan morcha - 96 kuli maratha

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण विरुध्द ओबीसी असे समीकरण मांडले जाते. सोबतच मराठा ९६ कुळी व कुणबी असाही भेद सरसकट सांगितला जातो. त्याबद्ल माहिती देणारा हा विशेष लेख !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली.

मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्या प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस या समितीच्या अहवालात करण्यात आली.

या अहवालाच्या जोरावरच मराठा समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 16 टक्के आरक्षण देऊ केले. पण पुढे कोर्टाने यावर स्थगिती आणली.

Image result for Maratha Reservation

आरक्षण देण्यासाठी हे सिद्ध करणं आवश्यक आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे. मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींना याआधीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे.

आता राणे समितीने असं म्हटलं की सगळेच मराठे कुणबी आहेत. त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टींनी मागास आहे. (कारण कुणब्यांचं मागासलेपण याआधीच सिद्ध करण्यात आलं आहे.)

सगळे मराठे कुणबी आहेत का?

ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या ‘द ट्राइब्स अॅंड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.

“मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमके कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही,” असे या पुस्तकात म्हटले आहे.

मराठा आणि कुणबी समाज एकच आहे, असा दावा नारायण राणे समितीने केला आहे. त्यांच्या अहवालात म्हटले आहे!

1. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता. याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले होते.

2. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करीपेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली.

मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसूलाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला.

Image result for Maratha Reservation

3. अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे.

महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘इशारा’ अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे.

4. संत तुकाराम महाराजांच्या ‘बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो’ या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असे म्हटले आहे.

5. छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं, “मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, कुणब्यांचा शेतकी एकच, असे आम्ही वर म्हणालो. यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यात राहणारे हे सिद्ध होते.

मात्र या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की, धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पिणें केवळ अशक्य झाले आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिसऱ्याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे.”

6. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29 टक्के आणि 7.34 टक्के होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली.

समितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीने केली आहे.

‘मराठा आणि कुणबी वेगळे आहेत’

मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत, असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे.

कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले. पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता.

कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता, असं समाजशास्त्राचे अभ्यासक सांगतात.

’96 कुळी’ सुद्धा कुणबी आहेत?

महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रीय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं.

याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे.

Image result for Maratha Reservation

त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्रा. रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या ‘मराठा 96 कुले’ या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.

“अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे.

याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते, व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं,” असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात.

96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. “96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त ‘मराठा’ असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे,” असे अभ्यासक सांगतात.

96 कुळी मराठे हेसुद्धा कुणबी असल्याचे मत अभ्यासकांकडून सतत मांडले जाते. “जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे,” असे अभ्यासक सांगतात.

मराठ्यांमधील उपजाती

“मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. इतिहासकालीन कागदपत्रं तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच 12 बलुतेदारांना मराठा म्हटले जायचे, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या.

जे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले. तर ज्यांच्याकडे जमिनीदारी होती त्यांनी स्वतःला ‘मराठा’च म्हणवून घेणं पसंत केले,” असं इंद्रजित सावंत सांगतात.

मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठे असा फरक आहे. पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात. त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही. सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्नं जुळतात. पूर्वी हे पाहिलं जात असे, पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही, सावंत पुढे सांगतात.

मराठवाड्यात कुणबी का कमी आहेत?

विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची सख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, असं निरीक्षक सांगतात. पण असं का आहे?

60 च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा ‘कुणबी’ आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली.

त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र ‘आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का?’ असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं.

Image result for Maratha Reservation

आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे, तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे, असं मत सामाजिक व राजकीय अभ्यासक मांडत आहेत.

मुळात मराठा जात की समूह?

सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला ‘रठ्ठ’ असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला ‘महारठ्ठ’ म्हणत.

आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला, असे समाजशास्त्राचे अभ्यासक सांगतात.

महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं.

कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असे आपण म्हणू शकतो.

“संपूर्ण मराठा ही एकच जात आहे. जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल. आणि जर पोटजाती त्यामध्ये आहेत, असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोटजाती आहेत.

ब्राह्मणांमध्ये पोटजाती आहेत. तरी देखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, 96 कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहे,” असे अभ्यासकांचे मत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये, ते कायद्याने शक्य आहे की नाही, वगैरे सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे, असे दिसून येते.

समाज व्यवहारातली जात, कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातली जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही.

९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत.

  • गोत्र –आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.
  • देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते. वृक्ष, पर्ण, फूल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
  • वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
  • १. सोमवंश २. सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे.

मराठा या शब्दाचे संस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा ऊर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंडय़ा पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे !

एको दस सहस्रणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्धरथ: स्मृत:।

भावार्थ : शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धय़ांबरोबर लढू शकतो, त्या रणधुरंधरासच मरहट मराठा म्हणतात. ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले.

विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासंबंधाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे. हा या बाबीस सबळ पुरावा होय.

श्री वाल्मीकी रामायण 

अयोध्याकांड, सर्ग ५१ श्लोक ६ यात दशरथाला महाराष्ट्रे (महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे. तसेच इसवी सनापूर्वी ६व्या शतकात जैन लोकांच्या कृतांग सूत्र या भद्रबाहूने लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र शब्द आढळतो. या ग्रंथाच्या आधाराने दुस-या शामाचार्यानी लिहिलेल्या श्री प्रज्ञापना उपांग सूत्र यात महाराष्ट्र शब्द आढळतो.

पश्चिम घाटात काल्र्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे. तेथील पाण्याच्या हौदावर महारथी साकोसिकी पुतसा! विष्णुदत्तसा देयाधमपोदी म्हणजे कौशिकपुत्र महारथी/महारठी/महारट्टी विष्णुदत्त याने हे बांधले असे लिहिले आहे आणि या लेण्याचा काळ इ. स. पूर्व ३०० वर्षाचा आहे.

मगध देशावर नंदाचे राज्य असताना, म्हणजे सुमारे २३०० वर्षापूर्वी वररूची होऊन गेला. त्याच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथात शेषं महाराष्ट्रीवत असा उल्लेख आहे, यावरून महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.

९६ कुळी मराठा गोत्र

आडनाव वंश गोत्र देवक
अहिरराव सूर्य भारद्वाज पंचपल्लव
आंग्रे चंद्र.. गार्ग्य.. पंचपल्लव
आंगणे चंद्र दुर्वास कळंब, केतकी, हळद, सोने
इंगळे चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळुंखी पंख
कदम सूर्य भारद्वाज, कळंब, केतकी, हळद, सोने
काळे सूर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोन, साळुंखी पंख
काकदे सूर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सूर्यफूल
कोकाटे सूर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
खंडागळे सूर्य वसिष्ठ कळंब, सूर्यफूल
खडतरे चंद्र लोमेश पंचपल्लव
खैरे चंद्र मरकडेय पंचपल्लव
गव्हाणे चंद्र कौशीक पंचपल्लव, साळुंखी पंख
गुजर सूर्य शौनक पंचपल्लव
गायकवाड चंद्र, गौतम पंचपल्लव, सूर्यफूल
घाटगे सूर्य काश्यप, साळुंखी पंख, पंचपल्लव
चव्हाण सूर्य काश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई
चालुक्य चंद्र भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख
जगताप चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर, वड, पिंपळ
जगदाळे चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार
जगधने चंद्र, कपिल, पंचपल्लव
जाधव, यादव चंद्र कौंडिण्य, अत्रि, कळंब, पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा
ठाकूर सूर्य कौशिक, पंचपल्लव
ढमाले सूर्य शौनल्य पंचपल्लव
ढमढरे सूर्य काश्यप कळंब
ढवळे चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार
ढेकळे चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.
ढोणे सूर्य भारद्वाज, कळंब, केतकी, हळद, सोने..
तायडे (तावडे) सूर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव
तावरे / तोवर सूर्य गार्ग्य उंबर
तेजे सूर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई
थोरात सूर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
थोटे (थिटे) सूर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
दरबारे चंद्र कौशीक पंचपल्लव
दळवी सूर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव
दाभाडे सूर्य शौनल्य कळंब
धर्मराज सूर्य विश्वामित्र, पंचपल्लव
देवकाते चंद्र कौशीक पंचपल्लव
धायबर चंद्र भारद्वाज उंबर, शंख
धुमाळ चंद्र दुर्वास हळद, आपटय़ाचे पान
नाईक चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल
नालिंबरे चंद्र भारद्वाज उंबर, शंख
निकम सूर्य पराशर, मान्यव्य, कळंब, उंबर, वेळू
निसाळ सूर्य वाजपेयी पंचपल्लव
पवार (परमार) सूर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार
प्रतिहार सूर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने
पानसरे चंद्र कश्यप कळंब
पांढरे चंद्र लोमेश पंचपल्लव
पठारे सूर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने, वासुंदीवेल
पालवे सूर्य भारद्वाज कळंब
पलांढ सूर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव
पिंगळे चंद्र भारद्वाज उंबर, शंख
पिसाळ सूर्य कौशीक पंचपल्लव, वड
फडतरे चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळुंखी पंख
फाळ्के चंद्र कौशीक पंचपल्लव
फाकडे सूर्य विश्वामित्र पंचपल्लव
फाटक चंद्र भारद्वाज कमळ
बागल सूर्य शौनक कळंब, पंचपल्लव
बागवर-बांगर चंद्र भारद्वाज उंर्ब, शंख
बांडे सूर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने
बाबर सूर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळुंखी पंख
भागवत सूर्य काश्यप कळंब
भोसले सुर्य कौशीक पंचपल्लव
भोवारे चंद्र कौशीक पंचपल्लव
भोगले (भोगते) सूर्य कौशीक पंचपल्लव
भोईटे सूर्य शौनक पंचपल्लव
मधुरे सूर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सूर्यफूल
मालपे चंद्र भारद्वाज उंबर, शंख
माने चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख
मालुसरे सूर्य काश्यप कळंब
महाडीक सूर्य माल्यवंत कळंब, पिंपळ
म्हांबरे चंद्र अगस्ति कळंब, शमी
मुळीक सूर्य गौतम पंचपल्लव, सूर्यफूल
मोरे(मोर्य) चंद्र भारद्वाज मयूर पंख, ३६० दिवे
मोहीते चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
राठोड सूर्य काश्यप सूर्यकांत
राष्ट्रकुट सूर्य कौशीक पंचपल्लव
राणे सूर्य जमदग्नी वड, सूर्यकांत
राऊत सूर्य जामदग्नी वड, सूर्यकांत, सूर्यफूल
रेणुस चंद्र विश्वामित्र पंचपल्लव
लाड चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल
वाघ सूर्य वत्स, विश्वावसू कळंब, हळद, निकुंभ
विचारे सूर्य शौनक पंचपल्लव
शेलार सूर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब, पंचपल्लव, कमळ
शंखपाळ चंद्र गार्ग्य शंख
शिंदे सूर्य कौंडिण्य कळंब, रुई, मृत्ति, केचावेल, भोरवेल
शितोळे सूर्य काश्यप वड, सूर्यकांत
शिर्के चंद्र शांडील्य कळंब, आपटय़ाचे पान
साळवे सूर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल
सावंत चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळुंखी पंख
साळुंखे सूर्य भारद्वाज पंचपल्लव, साळुंखी पंख
सांबरे सूर्य मान्यव्य कळंब, हळद
सिसोदे सूर्य कौशीक पंचपल्लव
सुर्वे सूर्य वसिष्ठ पंचपल्लव
हंडे सूर्य  विष्णुवृद्ध पंचपल्लव, सूर्यफूल
हरफळे चंद्र कौशीक पंचपल्लव
क्षिरसागर सूर्य वसिष्ठ कळंब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here