Maratha Reservation | मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादीने स्पॉन्सर्ड केल्या आहेत : फडणवीसांचा गंभीर आरोप

241

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरू झाले आहे. राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हाती निराशा लागल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

त्यावर सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी फडणवीस जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पॉन्सर्ड आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या, असे फडणवीस म्हणाले. 

‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा फडणवीसांची आठवण झाली. त्याआधी चर्चेला बोलवले नाही. आम्ही कायदा कोर्टात टिकवला होता. पण हे लोक टिकवू शकले नाहीत. आम्ही योग्य समन्वय साधून मराठा आरक्षण कायदा टिकवला असता’, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला आहे. 

राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी याआधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या काही लोकांशी बैठका देखील झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटे बोलण्याचा रोग जडला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने केलेला कायदा घटनादुरुतीपूर्वीचाच

केंद्र सरकारच्या अ‌ॅटर्नी जनरल यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आता अधिकार नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद सरकारने पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.

त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी 102 वी घटनादुरुस्तीपूर्वी भाजप सरकारने हा कायदा केला होता. आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय. आम्ही हा जो कायदा केला आहे तो 102 व्या घटनादुरुस्तीने बाधित होत नाही. कारण ते कायदा घटनादुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे. आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय. त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक चक्क खोटे बोलत आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here