-
मेहबूब शेख यांचा खुलासा ‘तो’ मी नव्हेच!
-
पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
-
नार्को टेस्टचीही तयारी
-
राजकीय षडयंत्रापोटी बदनामी
-
मेहबुब शेख कोण?
-
चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केला आहे.
औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले.
त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे. ज्या खुलशात या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मेहबूब शेख यांचा खुलासा
औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले.
संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं मेहबूब शेख म्हणाले.
14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही मेहबूब शेख म्हणाले. मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केले आहे.
यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत भावना आवरता आल्या नाहीत ते अक्षरशः ढसाढसा रडले.
त्यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले, “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. महिलेच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा.
जर काही केलं नसताना फक्त राजकीय द्वेषातून असे प्रकार व्हायला लागले, तर सर्वसामान्य घरातील मुलं राजकारणात येणार नाहीत.
सामान्य घरातील व्यक्तीचे राजकीय आयुष्य अशाप्रकारे उद्ध्वस्त करू नये. दोषी असल्यास मिळेल त्या शिक्षेला सामोरे जाईन.”
“मी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना फोन केला. तसेच याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली.
ज्या महिलेनं हा आरोप केलाय त्यांना मी कधी पाहिलेले नाही. गरज पडली तर मी नाक्रो टेस्ट करायला तयार आहे.
9, 10, 11 डिसेंबरला मी मुंबईत होतो. मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी,” असंही मेहबूब शेख यांनी नमूद केलं.
“राजकीय षडयंत्रापोटी मेहबूब शेख यांना अडकवण्याचा प्रयत्न”
महेश तपासे म्हणाले, “औरंगाबाद पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून मेहबूब शेख या नावाचा उल्लेख असलेली तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही व्यक्ती कोण याचा तपास लागण्याआधीच तक्रारीत नाव घेण्यात आलेली व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेच आहेत, असा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे.
भाजपकडून केवळ राजकीय षडयंत्रापोटी हा दावा करण्यात आला आहे. या आरोपांचं आम्ही खंडण करतो. या प्रकरणातील तपासाला मेहबूब शेख पूर्ण सहकार्य करतील”
यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले हे देखील उपस्थित होते.
बलात्काराचा आरोप झालेले NCP चे मेहबुब शेख कोण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजपकडून तीव्र निदर्शनं केली जाणार आहेत.
भाजप महिला आघाडीकडून साडे अकरा वाजता क्रांती चौकात तर भाजयुमोकडून 4वाजता निदर्शनं करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनही पोलिस महासंचालकांना निवेदन दिलं जाणार आहे.
मेहबुब शेख कोण आहेत?
- मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत
- मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी
- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय
‘तो’ मी नव्हेच!
बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबुब इब्राहिम शेख आपण नाही, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे.
फिर्याद दिलेल्या महिलेने 14 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील रामगिरी हॉटेलनजिकच्या एका महाविद्यालयाजवळील निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबुब इब्राहिम याने कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
त्यावरुन सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबुब शेख यांनी गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मेहबुब शेख कोण? असा सवाल पोलिसांनाच विचारला आहे.
या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन यामागील खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, असंही शेख यांनी म्हटले आहे.
फिर्यादीत फक्त नावाचा उल्लेख असल्यामुळे नेमका मेहबुब इब्राहिम शेख कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.
ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे. पीडिते आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
महिलासुरक्षेच्या बाता मारणार्या राज्यसरकार मधील @NCPspeaks चा युवकअध्यक्ष वर बलात्काराचा गुन्हा दाखल
चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही
आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्षकार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का मा.मुख्यमंत्री गृहमंत्री उत्तर द्या pic.twitter.com/0NLBCUkFrh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 29, 2020