शिरूर (पुणे) : कोरेगाव (ता. शिरूर) येथे गेल्या दोन वर्षांपासून हॉस्पिटल चालवणारा बोगस डॉक्टर बारावी नापास होता. पण, श्री मोरया मल्टी स्पेशालिटी नावाने तब्बल 22 बेडचे हॉस्पिटल तो चालवत होता.
नाव बोगस, पदवी बोगस आणि तो रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. मेहबूब शेख असे त्याचे नाव. पण, डॉ. महेश पाटील या नावाने तो हॉस्पिटल चालवत होता.
बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरु केले होते. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मेहबूब शेख हा नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचे उघड झाले.
मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील बोगस डॉक्टरचा प्रवास
डॉक्टर असल्याचं दाखवून 22 बेडचे स्वतः रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण माहिती दिली.
याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा.
नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असे वाटले की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत.
त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी श्री मोरया मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरु केले. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदलले. त्याने बनावट डिग्री आणि आधार कुठून मिळवले याचा तपास आम्ही करत आहोत.
विशेष म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र, त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे.
यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचा पुढील शोध पोलिस घेत आहेत.