माझ्यावर अत्याचार करणारा मेहबूब शेख | पीडित महिलेचा व्हिडीओ

138

औरंगाबाद  : माझ्यावर अत्याचार करणारा आरोपी मेहूबब इब्राहीम शेख हा राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्षच आहे.

त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. २६ डिसेंबर रोजी मी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तो जो दावा करतोय तो खोटा आहे, अशी माहिती पिडित तरूणीने एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तक्रारदार पिडीता बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू होती.

त्यानंतर स्वतः पीडित महिलेने हा खुलासा केला आहे. पोलीस मेहबूब शेख याला चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे.

नोकरीचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख याच्या विरोधात २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाखल करणारी पिडीत तरूणी ही गेल्या काही दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नाही.

तिने दिलेला पत्ता देखील चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर काल अचानक पिडित तरूणीने एक व्हिडिओ शेअर करत बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबूब इब्राहीम शेख हा दुसरा इतर कुणी नसून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्षच असल्याचे स्पष्ट केले.

२६ डिसेंबर रोजी मी औंरगाबादेत जो एफआयआर दाखल केला आहे.

त्यातील व्यक्ती ही राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा अध्यक्ष मेहबूब शेख हाच आहे.

तो जे सांगतोय तो खोटं बोलताेय. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली.

मी एक शिक्षित मुलगी आहे. त्यामुळे आता मला जे काही सांगायचे आहे ते मी न्यायालयातच सांगेन.

पोलीसांसमोर काहीही सांगणार नाही, असेही या तरूणीने व्हिडिओत म्हटले आहे.

खाजगी शिकवणी घेणाऱ्या बीएड शिकलेल्या तरूणीची ओळख बीड जिल्ह्यातील शिरूर येथील मेहबूब इब्राहीम शेख याच्याशी झाली होती.

बीडबायपास रोडवर ट्यूशन घेण्यासाठी खोली पाहत असतांना तिची आरोपीशी भेट झाली होती.

तेव्हा तुला मुंबईला चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, असे सांगून मेहबूब शेख याने सदर तरूणीला सिडको परिसरातील वंसतराव नाईक महाविद्यायाच्या परिसरात बोलावले होते.

कारमध्ये या तरूणीला बसवून तो तिला आपल्याला मुंबईला जावे लागेल असे म्हणत होता.

दोघे बोलत असतांनाच त्याने निर्मनुष्य ठिकाणी अंधारात कार नेऊन या तरूणीवर बलात्कार केल्याची फिर्याद तिने सिडको पोलीस ठाण्यात दिली होती.

मेहबूब शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा अध्यक्ष असल्याची बातमी पसरली आणि राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली होती.

दरम्यान, मेहबूब शेख याने आपण पिडित तरूणीला ओळलत नाही.

तिच्याशी कधी फोनवरून माझे बोलणे देखील झाले नाही, असे सांगत आरोप फेटाळले होते.

आपल्या विरोधात हे षडयंत्र असल्याचा दावा करत आपली नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील  केली होती.

पिडीत तरूणीच्या दाव्यानंतर आता पोलीस मेहबूब शेख यांचा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here