मेहबूब शेखच्या अडचणीत वाढ | प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा : नीलम गोरेंची मागणी

221

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना  निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे.

राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मेहबूब शेखला मोठा झटका दिला आहे. 

कारण बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणात बी समरी रिपोर्टची शक्यता लक्षात घेत या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

त्यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून म्हटलं आहे की, “या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस बी समरी फाईल करु शकतात. तसंच मेहबूब शेख हा तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीने केला आहे.

“माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच आहे. आता मला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलेन,” असं तरुणीने म्हटलं आहे. 

मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते, त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे.

नीलम गोऱ्हेंनी जारी केलेल्या पत्रकात काय म्हटलंय?

याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे की, “औरंगाबादमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली.

यात आरोपी म्हणतो तो मी नव्हेच! याशिवाय पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. त्यामुळे पूर्वीच्या केसेसप्रमाणे या केसमध्ये देखील पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा. तसेच औरंगाबाद इथल्या महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करुन त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत.

ज्या प्रकरणात बी समरी रिपोर्ट करुन बंद केल्या आहेत त्याचा आढावा घेण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी द्यावी.”

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखने अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे.

या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, “ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली.

त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेखने दाखवलं.

14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभा होता.

तरुणी मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले.

या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेखविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेखविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

डीसीपी दीपक गिर्हे यांना बडतर्फ करा : चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन डीसीपींना बडतर्फ करण्याची मागणी केली.

“पोलिसांनी अशा घटनेमध्ये माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया द्यायला नको होती. डीसीपी दीपक गिर्हे यांनी पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या वर्षभरात फोनवरुन संभाषण झालं नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

परिणामी पीडितेचे मनोबल खच्चीकरण झालं. त्यामुळे संबंधित डीसीपींना बडतर्फ करावी” असं त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here