लातूर : जिल्ह्यातील उदगीर शहरातील नगरपालिके समोरील फुटपाथवर पाल मारून राहणाऱ्या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले गुरुवारी (दि.२५) दुपार पासून गायब झाली होती.
त्यांच्या पालकांनी खूप शोधाशोध केली पण ती सापडली नाहीत. त्यामुळे पालकांनी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
अंकुश व्यंकटराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील अंकुश चव्हाण वय-१२, सचिन विक्रम चव्हाण वय-१३, दर्शन लक्ष्मण डांगे वय-१५ यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र या प्रकरणाचे धक्कादायक कारण मुले पुण्यात सापडल्यावर समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, घरात वडीलांनी किरकोळ कारणावरून रागावल्याच्या कारणाने रागाच्या भरात ही तीनही मुले शिर्डीला जाण्यासाठी निघाली.
यातील एका मुलांने घरातील साडेतीन हजार रुपये सोबत घेतले होते. शिर्डीला जाण्यासाठी उदगीर रेल्वे स्थानकावर आली, पण चुकून दुसऱ्या रेल्वेत चढली आणि रेल्वे शिर्डी ऐवजी पुणे रेल्वे स्थानकात आली.
जेव्हा ही मुले या गाडीत बसली व थेट पुण्याला गेली. तेव्हा पूर्णपणे गोंधळून गेली. आता पुढे काय? कोठे जायचे? काय करायचे? याचे भान नसल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेतील ही मुले रेल्वे स्टेशनवर फिरताना पोलिस कर्मचाऱ्यांना आढळली.
त्यांनी यां मुलाची चौकशी केली तेव्हा आपण उदगीरचे असल्याचे मुलांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून ही माहिती संबंधित पोलिसांनी लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास कळवली.
उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार व फोटोच्या वर्णनावरून ही मुले उदगीरचीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यापूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि पालक व पोलिसांचा संशय दूर झाला. पोलिसांनी मुलं सापडल्याचे पालकांना सांगताच पालकांचा जीव भांड्यात पडला.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे या मुलांना ताब्यात घेण्यासाठी पुण्याला रवाना झाले.
पोलीस उपनिरीक्षक अंदोरीकर यांच्यासह संजय दळवे, योगेश फुले, गजानन पुल्लेवाड, मच्छिंद्रनाथ वरटी, मारोती जायभाये, डीबी शाखा राजकुमार घोरपडे यांनी या शोध मोहिमेसाठी पुढाकार घेतला.