नवी दिल्ली : एम्सचे (AIIMS) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया, मेदांताचे डॉ.नरेश त्रेहान, एचओडी मेडिसीन आणि प्रोफेसर एम्स डॉ. नवीन विग आणि डीजी हेल्थ डॉ. सुनील कुमार यांनी COVID-19 च्या संबंधित मुद्द्यांविषयी माहिती देताना सांगितले, बहुतेक रुग्ण हे घरीच ठीक आहेत.
तसेच डॉ.गुलेरिया म्हणाले की, रेमडीसिवीर प्रत्येक रूग्णाला आवश्यक नसते, यामुळे माइल्ड प्रकरणांमध्ये याच्या वापरामुळे जास्त नुकसान होऊ शकते.
लोक घाबरुन रेमडेसिवीर इंजेक्शन ठेवण्यास सुरुवात केली आहे, यामुळे त्याचा साठा कमी झाला आहे आणि या कारणामुळे रेमाडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु झाला आहे.
ते म्हणाले, घाबरायचे काहीच नाही. ऑक्सिजनच्या अभावावर देखील ते म्हणाले की, काही लोकांनी ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याचा साठा करायला सुरुवात केली आहे, हे करणे चुकीचे व अमानवीय आहे.
90 % लोक घरातच बरे होऊ शकतात!
मेदांताचे डॉ.नरेश त्रेहान म्हणाले, रेमडेसिवीर हे जादूचे इंजेक्शन नाही. जेव्हा आपले सॅच्यूरेशन 95 -97 असते तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता नसते, अशा परिस्थितीत ऑक्सिजन अजिबात लावू नका.
कारण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. डॉ नरेश त्रेहान म्हणाले, आरटीपीसीआर चाचणी पॅाझीटिव्ह होताच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामध्ये जर रुग्णांनी घरी स्वत: ची काळजी व्यवस्थीत घेतली तर 90% लोक घरीच बरे होऊ शकतात.
योगाची मोठी भूमिका
डॉ. नरेश त्रेहान म्हणाले, कोरोना दरम्यान योगाची खूप मोठी भूमिका असते. प्राणायाम खूप प्रभावी आहे. जर आपल्याला श्वासोच्छवासाची समस्या येत असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि उपडी झोपा. हे आपल्या ऑक्सिजन पातळीवर नियंत्रण ठेवायला मदत करते. जर आपल्याला याचा फायदा होत नसेल तर डॉक्टरांना भेटा.
खूप मोठा बदल झाला आहे!
डॉ.सुनील कुमार म्हणाले, आमच्याकडे पूर्वी खूप कमी लॅब होत्या, पण आता आम्ही 2 हजार ते 2 हजार 500 प्रयोगशाळा बांधल्या आहेत. रूग्णालयात बेड वाढले आहेत.
ते म्हणाले, आम्ही गेल्या वर्षापेक्षा अधिक चांगली तयारी केली आहे. आम्ही अनेक गट तयार केले आहेत, ज्यात देशातील सर्वोच्च डॉक्टर आहेत. ते भारत सरकारला सल्ला देतात.