औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाच्या नंतर खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सदरील जल्लोष प्रकरणात खासदार जलील यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखला झाला आहे. औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जलील यांच्याविरूद्ध कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार जलील यांनी ‘चूक’ मान्य केली
जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याच्या या कृत्यावर सर्वच बाजूंनी कडक टीका झाली.
त्यानंतर खासदार जलील यांनी अखेर आपली चूक कबूल केली. होय, मी चूक केली. कायद्यानुसार कारवाई करा, असे जलील म्हणाले. परंतु त्यांची चूक मान्य करताना त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाउन रद्द, खासदार जलील यांचा जल्लोष
औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान ही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, पण जलील यांच्यासह अनेक नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.
जलील यांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा आदेश काल देण्यात आला.
लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जलील आणि त्याचे काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. जलील यांच्या कार्यालयासमोर समर्थकांनी मोर्चा काढला. जलील यांना पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली होती.
चंद्रकांत खैरे यांची जलील यांना अटक करण्याची मागणी
औरंगाबाद शहरातील कोरोनासाठी जबाबदारी इम्तियाज जलील आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर त्वरित कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्वरित अटक करा, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.
इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असा इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले कि, चंद्रकांत खैरे यांना कायद्याचे ज्ञान नाही, म्हणून ते काहीही बोलतात, असे टोला लगावला आहे.