MPSC Exam Postponed : पुण्यात विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक | निर्णय तत्काळ रद्द करावा : देवेंद्र फडणवीस

209
MPSC exam postponed

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेलीय. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

परिणामी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती आणि इतर शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे.

एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.

MPSC च्या परीक्षांसाठी पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते.

मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.

निर्णय तत्काळ रद्द करावा : देवेंद्र फडणवीस 

राज्य सरकारकडून कोरोनाचे नाव सांगून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभर विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक  झाला आहे.

पहिल्यांदा या आंदोलनाची ठिणगी पुण्यात पडल्यानंतर त्याचे लोण आता राज्यभर पसरले आहे. त्यामुळे भाजपनेही आता या आंदोलनात उडी घेतली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे.

त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! #MPSC त्यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला  टॅग  केलं आहे.

परीक्षा तीन दिवसांवर आली असताना पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी संतापले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनात पहिल्यांदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर उतरले. त्यानंतर आंदोलनला जोर चढला. गर्दी वाढत चालल्याने रॅपिड ॲक्शन फोर्सला पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिकेला गर्दीतून रस्ता करून दिला.

गोपीचंद पडळकर यांनी जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांना पीपीई किट घालावी तरी चालतील, पण नियोजित परीक्षा झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here