मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला.
कॅलेंडर शूट, वेबसीरिज तसेच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने या तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या आठ उदयोन्मुख अभिनेत्री, मॉडेल यांची सुटका करीत एका निर्मात्यासह दोन महिलांना अटक केली.
चित्रपट क्षेत्रात सक्रिय असलेला एका निर्माता वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवीत असल्याची माहिती मिळाली. प्रेम उर्फ संदीप इंगळे असे या निर्मात्याचे नाव आहे.
अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने हे सेक्स रॅकेट सुरू असल्याचे समजले.
गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी बोगस ग्राहक तयार करून या तिघांशी संपर्क साधला. त्यानुसार तान्या आणि हनुफा यांनी व्हॉट्सएपवरून पसंतीसाठी तरुणींचे फोटो पाठवले.
तरुणी पसंत केल्यावर जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येत असल्याचे या तिघांनी सांगितले. वाझे यांच्यासह संतोष कोतवाल, रियाझुद्दीन काझी, नितीन लोंढे, कीर्ती माने, बिपीन चव्हाण, योगेश लोहकरे, म्हस्के यांच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून आठ मुलींची सुटका केली.
चौकशीदरम्यान काम देण्याच्या बहाण्याने या तरुणींची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले. संदीप इंगळे आणि दोन महिला दलाल यांचा हा धंदा गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे.
तरुणी पुरविण्यासाठी त्यांनी काही संकेतस्थळांचाही वापर केल्याचे समोर आल्याने एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली हे रॅकेट तरुणी पुरवीत असल्याचाही संशय आहे.
त्याचप्रमाणे या रॅकेटमध्ये चित्रपट, तसेच मॉडेलिंग क्षेत्रात बड्या व्यक्तींचा सहभाग आढळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.