केरळात संघ स्वयंसेवकाची हत्या | एसडीपीआयच्या 8 कार्यकर्त्यांना अटक

181

अलप्पुझा : अलप्पुझा जिल्ह्यातील रा. स्व. संघ स्वयंसेवकाच्या हत्येप्रकरणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

एसडीपीआय ही कट्टर इस्लामिक संघटना पीएफआयची राजकीय आघाडी आहे. बुधवारी रात्री चेरथलाजवळील नागमकुलंगारा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर नंदू आर. कृष्णा याची एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती.

रा. स्व. संघ आणि एसडीपीआय यांच्याशी संबंधित किमान सहा जण या हाणामारीत जखमी झाले असून, त्यांना त्यांना अलप्पुझा आणि एर्नाकुलमच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. रा. स्व. संघाच्या जखमी स्वयंसेवकांपैकी एक गंभीर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, संघ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेच्या विरोधात भाजपा आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी बंदचे आवाहन केले आहे.

हा बंद सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष एम. व्ही. गोपाकुमार यांनी दिली.

दरम्यान, केरळ प्रदेश भाजपाध्यक्ष के. सुरेंद्र यांनी संघ स्वयंसेवकाच्या हत्येचा कठोर शब्दात निषेध केला असून, यासाठी पीएफआयला जबाबदार ठरविले आहे.

केरळमधील कासारगोड ते तिरुअनंतपूरम्‌ या भाजपाच्या विजय यात्रेचे उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले होते.

योगींना विरोध दर्शविण्यासाठी एसडीपीआयने नुकतेच जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन केले होते. यानंतर परिसरात तणाव वाढला होता व त्याचे रूपांतर बुधवारी संघ स्वयंसेवकाच्या हत्येत झाले, असे माध्यमांनी म्हटले आहे.

एसडीपीआयच्या मोर्चानंतर दोन्ही गटांनी पुन्हा या भागात परस्परविरोधी मोर्चा काढला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here