प्रेमविवाहानंतर तीन महिन्यात खून | रात्रभर पत्नीच्या मृतदेहा शेजारीच बसून राहीला !

420

पुणे : प्रेम विवाह झाल्यानंतर पतीने कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची घटना पुण्यात देहू येथे घडली आहे.

श्री क्षेत्र देहू येथील वडाचा मळा येथे राहणाऱ्या वैभव लांबकाणे या तरुणाने घरा जवळच राहणाऱ्या पूजा पाटील हिच्यासोबत मागील तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता.

वैभवच्या घरच्यांचा या प्रेम विवाहाला विरोध होता. विवाहानंतर अनेक शुल्लक कारणावरून पती वैभव हा पत्नी पूजाला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता.

गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पती वैभव आणि पत्नी पूजा यांच्यात जोरदार भांडण झाले. हा राग मनात धरून मध्यरात्री पूजा झोपेत असताना भांडणाचा बदला घेण्यासाठी वैभवने झोपेत असतानाच पूजाचा गळा दाबला.

त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी तसेच वैभवच्या हातातील गळा सुटावा यासाठी पूजाने अनेक वेळा प्रयत्न केले पंरतू तिचा मृत्यू होईपर्यंत वैभवने तिचा गळा सोडला नाही आणि अखेर पूजाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे पूजाचा खून केल्यानंतर रात्रभर पूजाच्या मृतदेहा शेजारीच वैभव बसून राहीला. त्यानंतर सकाळ होताच मयत पूजाच्या नातेवाईकांना त्याने सांगितले की, पूजाच्या छातीत दुखत होते त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

यानंतर नातेवाईक तात्काळ पूजाच्या घरी दाखल झाले असता बिछाण्यातच तिचा मृतदेह त्यांना आढळून आला. मृतदेहाची अवस्था व प्रत्यक्षात परिस्थिती पाहून त्यांची शंका बळावली.

संबधीत घटनेबाबत पूजाच्या नातेवाईकांनी देहूरोड पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता त्यांनाही संपूर्ण प्रकार बनावट व संशयास्पद वाटला.

तेव्हा पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक कलहातून वाद झाल्याने पूजाचा गळा आवळून मारल्याची कबुली त्याने दिली.

मावळ तालुक्यातील आठवड्याभरात दुसरी हत्येची घटना आहे. याआधी तळेगाव येथील 22 वर्षीय सुनेने कौटुंबिक वादातून कापडी ब्लाउजने आपल्या सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.

याप्रकरणी विवाहिते सह मयत महिलेच्या मुलाला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात बायकोला पतीने देखील साथ दिल्याचे उघड झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here