राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. बाळासाहेब थोरात यांच्यानंतर कोण? यावर अनेक दिवस चर्चा झाली.
बाळासाहेब थोरात यांच्यानंतर पक्षाला एक आक्रमक व ओबीसी चेहेरा असावा अशी मागणी होत होती. कारण राष्ट्रवादी व सेनेच्या सत्तेत आपला हक्काचा वाटा मागणारा प्रदेशाध्यक्ष हवा होता.
राज्यात गेल्या मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा असे दोन गट झाले आहेत. ही परिस्थिती असतानाच काँग्रेसने अत्यंत आक्रमक आणि ओबीसी चेहरा असलेल्या नाना पटोलेंना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नेमून नवा प्रयोग केला आहे.
देशभरात मोदी लाट असताना त्यांनी भाजप खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांची बरीच चर्चा झाली होती. सत्तेत असूनही त्यांनी राजीनामा दिला होता.
त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली नव्याने राजकीय इनिंग सुरु केली. त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर नेते प्रफुल्ल पटेलांना पराभवाची धुळ चारली होती.
मात्र त्यांनी मोदी सरकारची शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता पाहून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार करत भाजपाविरोधाची मोहीम हाती घेतली होती.
त्यांनी महापर्दाफाश यात्रा करत भाजपला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पीएम मोदींवर कडाडून प्रहार करताना मोदी व फडणवीस सरकारचे पुरेपूर वाभाडे काढले होते.
सध्या ओबीसी मतपेढी आणि राजकारणावरून राज्यात रणकंदन माजले आहे. त्यामुळे ओबीसी वर्ग सांभाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून चांगलीच कसरत सुरु आहे.
त्यामुळे काँग्रेसने ओबीसी आणि आक्रमक चेहऱ्याचा सक्षम पर्याय म्हणून नाना पटोलेंच्या खांद्यावर पक्षाचे धुरा सोपविली आहे. त्यामुळे ते या परिस्थितीचा कसा फायदा उठवतात हे येणारा काळ सांगणार आहे.
दुसरीकडे मोटी लाटेत त्यांनी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी भूमिका पाहून राजीनामा दिला. विशेष म्हणजे दिल्लीतही आजघडीला शेतकऱ्यांची आरपारची लढाई सुरु आहे.
भाजपकडेही विदर्भात मातब्बर नेत्यांची फळी आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सुद्धा विदर्भावर विशेष प्रेम असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यांचा नेहमी तो बालेकिल्ला राहिला आहे.
त्यामुळेच की काय विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा लागली होती. दरम्यान, राज्यात नाना पटोलेंच्या दिमतीला तगडी टीम देण्याता आली आहे.
त्यांच्यासोबत ६ कार्यकारी अध्यक्ष, तर १० प्रदेश उपाध्यक्ष देण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस संसदीय समितीमध्ये ३७ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
कार्यकारी अध्यक्षपदी शिवाजी मोघे (यवतमाळ) बसवराज पाटील (उस्मानाबाद) नसीम खान (मुंबई) कुणाल पाटील (धुळे) चंद्रकांत हंडोरे (मुंबई) प्रणिती शिंदे (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसरीकडे प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी (जळगाव) रमेश बागवे (पुणे) हुसैन दलवाई (मुंबई) मोहन जोशी (पुणे) रणजीत कांबळे (वर्धा) कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद) बी. आय. नगराळे, शरद अहेर (नाशिक), एम. एम. शेख (औरंगाबाद) माणिकराव जगताप (रायगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.