मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले आल्यानंतर कॉंग्रेस आक्रमक होऊ लागली आहे. कारण नाना पटोले पहिल्या दिवसापासून आघाडीमधील नेत्यांना ‘कॉंग्रेसला गृहीत’ धरु नका असे सुचवत आहेत.
राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढेल व पुढची सत्ता काँग्रेसची असेल, असा विश्वास व्यक्त करणारे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज आपल्याच सरकारला इशारा दिला आहे.
काँग्रेस आमदारांना निधी कमी दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याआधी यावरून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती.
काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्यावरून पटोले यांनी अगदी थेट शब्दांत सरकारला लक्ष्य केले आहे. ‘काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे’, याचे स्मरण करून देतानाच काँग्रेसला बेदखल करू नका, असा इशाराच एकप्रकारे पटोले यांनी दिला.
आज यावर नाना पटोले यांनी आपलं म्हणणं अत्यंत परखड शब्दांत मांडलं. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात असू द्या, असे सांगतानाच एखादी गोष्ट कमी दिली जात असेल तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही.
केवळ समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे, असे पटोले यांनी सांगितले. एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना पटोले यांनी कठोर संदेशच या माध्यमातून दिला आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे. हे पद काँग्रेसकडेच राहणार की महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांकडून या पदावर दावा सांगितला जाणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
काँग्रेसने मात्र हे पद आपल्याकडेच राहणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. या अनुषंगाने प्रश्न विचारला असता पटोले यांनी निवड प्रक्रियेवरच प्रतिक्रिया दिली. विधानसभेचा अध्यक्ष बिनविरोध नेमण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे.
आताही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून जी परंपरा महाराष्ट्रात आहे ती कायम ठेवावी. संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वादविवाद होऊ नये ही आमची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.