राजीव सातव यांच्याबाबत नांदेड काँग्रेस कमिटीची अनास्था | जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांंत नाराजी

446

नांदेड काँग्रेस तर्फे राजीव गांधींच्या आदरांजली सभेत राजीव सातव यांनाही श्रद्धांजली!

नांदेड : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना त्यांच्या स्मृतीनिमित्त अभिवादन करतानाच जिल्हा आणि शहर काँग्रेसने राजीव सातव यांनाही श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केला. पक्षाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात मात्र श्रद्धांजलीचा उल्लेख नाही!

राजीव सातव यांच्याबाबतीत स्थानिक काँग्रेस समितीने दाखविलेल्या अनास्थेची जिल्हाभर काँग्रेस कार्यकर्त्यांंत चर्चा होत आहे. काँग्रेसच्या अनास्थेमुळे पक्षातील नेत्यांत व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याची खंत पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांची प्रतिक्रिया होती की, आम्ही जिल्हा कार्यालयात शुक्रवारी श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांंजवळ सांगितले.

प्रत्यक्षात मात्र दिवंगत पंतप्रधान आणि माजी पक्षाध्यक्षास अभिवादन करण्याच्या कार्यक्रमातच खा. राजीव सातव तसेच माजी खासदार गंगाधर कुंटूरकर, रावसाहेब अंतापूरकर व संभाजीराव मंडगीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, असे काँग्रेसच्या दुसऱ्या पत्रकातून स्पष्ट झाले.

काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती इतर पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कळविली होती. त्यात राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.

काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या एकंदर वर्तनाबद्दल भाजपच्या स्थानिक खासदारानेही आश्चर्य व्यक्त केले. उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला एक तरुण नेता गमविल्याचे दु:ख ‘भाजप’ पक्षाच्या प्रमुखांनी व्यक्त केले. पण नांदेडमध्ये त्याचे काही नाही, टोलाही भाजप खासदाराने लगावला.

माजी पदाधिकारी अनभिज्ञ

काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आल्यानंतर पक्षाच्या दोन्ही शाखांतर्फे मास्क आणि अन्न वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. काही माजी पदाधिकाऱ्यांना वरील कार्यक्रमाबद्दल कळविण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले.

नांदेड मध्ये जे घडले तर राज्यातील अनेक ठिकाणी घडले आहे. काही ठिकाणी तर राजीव सातव यांच्याबद्दल कमालीची अनास्था दाखविली गेली आहे. ही अनास्था पक्षातील मनोबल खच्ची करणारी असल्याचीही खंत जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here