कोविड-19 लसीकरणासाठी देशात पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रम ठरवलेल्या व्यक्तिंना मोफत लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आज ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तिंसह इतर कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे.
आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या
बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था – आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते.
शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून, देशातल्या बहुतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
२०१४ पर्यंत देशात १४ व्यवस्थापन संस्था होत्या, त्यांची संख्या आता २० झाली असल्याचं ते म्हणाले. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
कोविड लसीकरणासाठी आज
देशभरात रंगीत तालीम होत आहे. राज्यात यासाठी पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालना या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, नंदुरबार जिल्ह्यात ही रंगीत तालीम पार पडली.
जिल्ह्यात जिल्हा सामांन्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, या तीन ठिकाणी आज लसीकरणाची सराव चाचणी घेण्यात आली.
अतिशय शिस्तबद्धपणे नियमांचं पालन यावेळी करण्यात आलं. यावेळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या रेशमा चाफेटकर यांच्यावर प्रथम सराव चाचणीचा प्रयोग करण्यात आला.
जालना जिल्ह्यातल्या तीन आरोग्य केंद्रांमध्ये, जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय, अंबड इथलं उप जिल्हा रुग्णालय, तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येत आहे.
देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर
आणखी सुधारला असून, आता तो ९६ पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल २२ हजार ९० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९९ लाख सहा हजार ३८७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
देशात काल नव्या १९ हजार ७८ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या, एक कोटी तीन लाख पाच हजार ७८८ इतकी झाली आहे.
काल २२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, आतापर्यंत या आजारानं एक लाख ४९ हजार २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातला कोविड मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी मृत्यूदर आहे. देशात सध्या दोन लाख ५० हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या कोविड-19
वरील लसीला, तातडीच्या वापरासाठी परवानगी ठराविक अटीसोबत देण्याबाबत, भारतीय औषध महानियंत्रकांच्या विषय तज्ज्ञ समितीनं शिफारस केली आहे.
या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली, त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला.
देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला सुरक्षितता, परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा, अशा विविध नियामक अटी या समितीनं सिरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत.
रुग्णसेवा कल्याणार्थ करण्यात येणाऱ्या
प्रत्येक कार्यास आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी शासन कटीबद्ध असून, वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्वांना अधिक पाठबळ देण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
हिंगोली इथं इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे आयोजित जिल्ह्यातले कोरोना योद्धा डॉक्टर, ज्येष्ठ डॉक्टर, सर्व माजी अध्यक्ष आणि अन्य सर्व संबंधितांच्या सत्कार समारंभात आरोग्य मंत्री बोलत होते.
देशातल्या विविध विद्यापीठातल्या आणि शिक्षण
संस्थांमधल्या आठशेहून अधिक शिक्षणतज्ञांनी सुधारीत कृषी कायद्याच्या समर्थन पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास असून, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही, असं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना
अपंगत्व आल्यास आणि तरीही सेवेत कायम ठेवले असल्यास त्याना “अपंगत्व भरपाई” देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांना निहित दरानुसार एक रकमी भरपाई दिली जाईल. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग
यांचं आज निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. ते आठ वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. बुटा सिंग हे २००७ ते २०१० या काळात राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष होते, तसंच बिहारचे राज्यपाल होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुटा सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.