ट्रॅक्टर रॅलीत नवरीत सिंहचा मृत्यू | पोस्टमॉर्टेम अहवालात मृत्यूचं ‘कारण’ उघड

248

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मंगळवारी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलकांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार घडून आला. 

या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. या आंदोलकाचं नाव नवरीत सिंह असं आहे. उल्लेखनीय म्हणजे, केवळ तीन दिवसांपूर्वी २७ वर्षीय नवरीत सिंह ऑस्ट्रेलयातून मायदेशात परतला होता. 

नवरीत सिंह हादेखील दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होणार आहे, याची कुटुंबीयांनादेखील माहिती नव्हती. नातेवाईकाकडे जात असल्याचं सांगून तो घराबाहेर पडला होता.

परंतु, मंगळवारी त्याच्याशी फोनवर संवाद झाला तेव्हा त्यानं आपण शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचं सांगितलं, असं वडील साहब सिंह यांनी म्हटलंय.

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी गावातून अनेक जण राजधानी दिल्लीत दाखल झाले होते.

या दरम्यान आयकर कार्यालय भागात झालेल्या हिंसाचारात काही जण चुकीच्या पद्धतीनं आणि अत्यंत वेगानं ट्रॅक्टर चालवत होते. आमच्या समोर एक ट्रॅक्टर अत्यंत वेगानं आला आणि बॅरिकेडिंगला धडकला.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली तेव्हा डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं लक्षात आलं.

नवरीत सिंह याच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण उघड झालंय. नवरीतचा मृत्यू झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शींनी गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली होती.

परंतु पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, गोळी लागून नाही तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नवरीतचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेमनंतर नवरीतचा मृतदेह नवरीतच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

आयकर कार्यालयाजवळ पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करत असताना नवरीतचा ट्रॅक्टर पलटला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरीत सिंह उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील डिब्बा गावचा रहिवासी होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला नवरीत सिंह पाच वर्षांपूर्वी स्टडी व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला होता.

तिथेच त्यानं दोन वर्षांपूर्वी बिलासपूरची रहिवासी असलेल्या आणि स्टडी व्हिसावर ऑस्ट्रेलियात आलेल्या मुलीसोबत विवाह केला होता. नवरीत आणि त्याची पत्नी एकाच हॉटेलमध्ये नोकरी करत होते. त्याची पत्नी सध्या ऑस्ट्रेलियात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here