नवाब मलिक यांनी पुरावा द्यावे अन्यथा माफी मागावी : भाजप आक्रमक

287
Nawab Malik

मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही.

केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करुन दिली आहे.

भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत असे ट्वीट करत नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

हे उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्रसरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्रसरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.

या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे.

जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्या या आरोपांवर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ‘नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी.

सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं असं त्यांनी सांगितले आहे.’ असे ट्विट करत नवाब मलिक यांना उपाध्ये यांनी आव्हान दिले आहे.

तसेच नवाब मलिक यांचे मत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी. किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यास रोखावे असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here