2021 या वर्षाला आणि एका नव्या दशकाला अगदी दणक्यात सुरुवात झाली. उत्साह आणि कमालीच्या सकारात्मकतेनं सर्वांनीच या वर्षाचं स्वागत केलं आणि आपआपल्या परिनं आता प्रत्येकजण या 2021 साठी सज्ज होत आहे.
सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे नाहीत. बॉलिवूडसाठी यंदाचं वर्ष हे लगीनघाई किंवा लग्नसराईचं वर्ष असू शकतं. 2020 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळं अनेक सेलिब्रिटी मंडळींनी त्यांचे विवाहसोहळ्यांचे बेत पुढे ढकलले.
त्यामुळं यंदाच्या वर्षी बी- टाऊनंच्या दारी सनई- चौघड्यांचेच सूर गुंजणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी, म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. तेव्हा आता हे दोघंजणही 2021 मध्ये सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघंही 2020 मध्ये एप्रिल महिन्यातच विवाहबंधनात अडकणार होते. पण, कोरोनानं सारीच घडी विस्कटली. अखेर आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अली आणि रिचा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

2019 पासूनच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. अखेर आता यंदाच्या वर्षी तेसुद्धा लग्नबंधनात अडकण्याच्या निर्णयावर पोहोचू शकतात असं म्हटलं जात आहे.

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री, मॉडेल, सूत्रसंचालिका शिबानी दांडेकर बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2021 मध्ये ही सेलिब्रिटी जोडीही विवाहबंधनाच्या मार्गावर आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल या दोघांनीही आता खुलेपणानं आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळं किमान यंदा तरी हे सेलिब्रिटी कपल एका नव्या नात्याची सुरुवात करतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.