मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) याप्रकरणात सचिन वाझे यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडले आहेत.
त्यानंतर आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पीपीई किट घालून चालायला लावणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती.
एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे.
त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेतील.
त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे.
त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन अनेक पुरावे समोर आणले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांचा सचिन वाझे यांच्या गुन्हे तपास शाखेशी (CIU) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे.
यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती.
त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती.
या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या.
यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.