लातूर शहरासह निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा शहरात रात्रीची संचारबंदी लागू

263

लातूर : लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटवण्यात आले असून जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशात अत्यावश्यक सेवांना वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना सूट देण्यात आलेली आहे. या आदेशाचे कोणीही उल्लंघन करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आज पहिल्याच रात्री शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर पोलिसांनी 11 वाजेनंतर नाकाबंदी केली होती.

प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. रात्री उशीरा दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहराच्या प्रत्येक भागात पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत.

कोविड-19 प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियम शारीरिक अंतर, फेसमास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी सावधगिरीच्या नियमांचा कोटेकारेपणे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे ही आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here