चाकुर (लातूर): भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती विरूध्द भाजपच्याच सहा सदस्यांंनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि.२६) विशेष सभा बोलविण्यात आली होती, यासभेला एकही सदस्य उपस्थित न राहिल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळा आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी बारा वाजता बैठक बोलविण्यात आली होती.
सभापती जमुना बडे व उपसभापती सज्जन लोणावळे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत.
पंचायत समितीच्या विकास कामात दोघेंही हेतुपरस्पर अडथळा निर्माण करीत आहेत, इतर सदस्यांना अरेरावीची भाषा वापरतात.
या कारणावरून त्यांच्या विरोधात पंचायत समिती सदस्य महेश वत्ते, सरीता मठपती, सुनिता डावरे, विद्याताई शिंदे, उमादेवी राजेमाने, वसंत डिगोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.
अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सर्व सदस्य बाहेरगावी सहलीला गेले होते. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्यानंतर या अविश्वास ठरावाच्या बैठकीला एकही सदस्य उपस्थित राहिला नाही.
त्यामुळे सभापती व उपसभापतीविरूध्दचा ठराव फेटाळण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, सहायय्क गटविकास अधिकारी आकाश गोकनवार, विस्तार अधिकारी एकनाथ बुआ आदी उपस्थित होते.