पुणे: किल्ले शिवनेरीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात, पण साधेपणाने साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांच्या भाषाज्ञानाचा उल्लेख केला होता. अजितदादांना डोळ्यांची भाषा ओळखता येते असे बेनके म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी तोच धागा पकडून फटकेबाजी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यात ‘इंगित विद्याशास्त्र’ ही एक भाषा होती. या भाषेमुळं एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे ओळखता येते.
आता ती भाषा मी शिकणार आहे. अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी मी ही भाषा शिकणार आहे. मग त्यांनी अगदी गॉगल घातला, मास्क लावला तरी त्यांच्या मनातलं ओळखणार,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.
शिवराय आमच्या रक्तामध्ये
‘शिवरायांपुढं नतमस्तक व्हायला शिवजयंतीच हवी असे नाही. त्यांचे स्थान आपल्या मनात, हृदयात आहे. कुठल्याही कामासाठी निघताना नकळत त्यांचे स्मरण होते, कारण ते आपल्या धमन्यांमध्ये आणि रक्तामध्ये आहेत,’ असे ते यावेळी म्हणाले.
मास्क हीच ढाल!
शिवजयंती सोहळ्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी करोनाच्या संकटाचीही जाणीव सर्वांना करून दिली. ‘शिवरायांच्या काळातील युद्ध आता नाही. त्यावेळच्या ढाल, तलवारी नाहीत.
मात्र, आता करोनाविरुद्धचं युद्ध सुरू आहे. त्यापासून स्वत:चा बचाव करायचा आहे. वार करायचा तेव्हा करूच, पण वार अडवण्यासाठी ढाल लागते. करोनाविरुद्धच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे,’ असं सांगून त्यांनी मास्कचे महत्त्व अधोरेखित केले.
लढण्यासाठी केवळ तलवार असून चालत नाही तर जिगरही लागते. करोनाशी लढण्याची ती जिगर आणि प्रेरणा शिवरायांकडून आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार,’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, अमोल कोल्हे, अतुल बेनके, विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी यावेळी उपस्थित होते.