न्यूड शूट आणि तथाकथित बॉडी पॉझिटीव्हिटी

647

पाश्चात्य जगतातून वेगवेगळी फॅड येत असतात आणि आपल्याकडील निर्बुद्ध त्याचे अंधानुकरण करत असतात. काही वर्षांपूर्वी झिरो फिगरचे खूळ आले होते आणि त्याला काही प्रसिद्ध अभिनेत्री बळी पडल्यावर हे लोण अगदी गल्लीपर्यंत पोहोचले होते.

हे फॅड इतके वाढले की बारीक राहण्याच्या अट्टाहासापोटी या पोरी कॉलेजमधील प्रॅक्टिकलदरम्यान उभे राहता न येता भोवळ येऊन टपाटप पडू लागल्या. बरे यांचे कपडे असे की तपासायला येणार्‍या डॉक्टरला शरम वाटू नये म्हणून कॉलेजवाल्यांनी पूर्ण उंचीचा स्कर्ट तयार ठेवलेला असायचा.

आता नवे खूळ आले आहे ते बॉडी पॉझिटिव्हचे. म्हणजे काय तर ज्या आकारात आहात आणि ज्या स्वरूपात आहात, त्याची लाज वाटू न देता आनंदी रहा. आणि हे बव्हंशी जाड-अतिजाड-जडपणाची परिसीमा गाठलेल्या महिलांसाठी. हो. हे सहसा महिलांसाठी चालते. झिरो फिगरच्या नाटकाची टूम पुरूषांसाठी निघाली नव्हती (हे नशिब)!

अन्यथा पुरूषांसाठी चेहर्‍याला लावण्याच्या वेगळ्या पावडरीच्या व तत्सम जाहिरातींना बळी पडणार्‍या पुरूषांनी तेही सुरू केले असते. सुरूवातीला आपल्याकडे जाड व्यक्तींसाठी असे तयार कपडे मिळत नसत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मापासाठी वेगळा विभाग दिसू लागला. अन्यथा त्यांना कपडे शिवून घेण्याशिवाय पर्याय नसे.

मध्यंतरी एका लोकप्रिय मालिकेचा नायक खाऊन-पिऊन सुखी या सदरात मोडणारा नाही; तर चक्क जाडच होता. ‘मापात नसलेल्या’ पुरूष वर्गाला आपला प्रेक्षक बनवण्याचा डाव त्यामागे होता, असे वाचण्यात आले होते. प्रत्यक्षात काय घडत आहे? मापात नसलेले स्त्री-पुरूष; मग ते वजनकाट्याच्या दोन्ही बाजूंनी मापात नसणारे असतील.

त्यांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासलेले असते. कमी वा अधिक वजन हे दोन्हीही अपायकारकच. ते आवर्जून तसेच ठेवण्यासाठी जे काही करावे लागते, ते सर्वस्वी अपायकारकच असते. आणि अशा शरीराचा अभिमान बाळगायचा म्हणजे नक्की काय असते? भलेही तुम्ही आपल्या शरीराची लाज बाळगू नका.

पण जे शरीर व्यायाम करून वा उत्तम आहार घेऊन कमावलेले नाही, तर उलट सगळीकडून ओघळत आहे, त्या हृदयावर अतिरिक्त ताण देत आहे, विविध व्याधींचे आगर बनणार आहे, साधे पादण्यासाठी बूड उचलण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज पडणार आहे, ते गुडघे वरच्या वजनामुळे चिरडले जाण्याच्या बेतात येणार आहेत, त्याचे काही करणार की नाही?

हेदेखील लक्षात घ्यायला हवे की एखाद्या व्यक्तीचा व्यंगावरून उल्लेख करण्याबाबतच्या संवेदनशीलतेबद्दल जागृती घडत आहेच. मात्र ते व्यंग सदर व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरचे असते. लठ्ठ-अतिलठ्ठपणा हा क्वचितच नैसर्गिक म्हणजे वैद्यकीय कारणांमुळे असतो. त्यामुळे कोणी अशा व्यक्तीला जाडे वा जाडी असे संबोधू नये वा तिची त्यावरून चेष्टा करू नये अशी अपेक्षा योग्य असली तरी त्या अवस्थेत कौतुक करण्यासारखेही काही नसते हे लक्षात घ्यायला हवे.

आता हे खूळ तेथेच थांबलेले नाही. सुरूवातीला हे वैयक्तिक पातळीवर होते. मात्र विविध कंपन्या त्याचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करून न घेतील तरच नवल वाटले असते. तर या जाड व अतिजाड पब्लिकला मॉडेलिंगसाठी वापरले जाऊ लागले. मागे कृष्णवर्णियांना अमेरिकेत भेदभावाची वागणूक मिळते याचा निषेध म्हणून रग्बी खेळाडू असलेल्या एका गोर्‍या व काळ्या पालकांच्या कृष्णवर्णीय मुलाने अमेरिकेच्या राष्ट्रगीताच्या दरम्यान उभे राहण्याऐवजी गुडघ्यावर बसण्याची कृती केली.

तो काही जणांचा हिरो बनला. हे त्याच्या स्वत:च्या आईला पसंत पडले नाही. तुला निषेधच करायचा होता तर कितीतरी अनेक निमित्तांनी व अनेक प्रकारांनी ते करता आले असते. मात्र हे राष्ट्रगीतादरम्यान करणे कदापि उचित नाही हे तिने त्याला ऐकवले. आणि तरीही त्याच्या या कृत्याला उचलून धरत एका नामांकित कंपनीने त्याची जाहिरात केली. त्यातून त्या कंपनीची भरपूर धन झाली. यावरून हे कळू शकते की तारतम्य हा शब्द न वापरताही लोक आपले उखळ पांढरे करून घेऊ शकतात.

तसाच प्रकार या बॉडी पॉझिटीव्ह प्रकाराबाबत झालेला आहे. एका कृष्णवर्णीय अतिजाड महिलेने आपले स्तन हाताने झाकलेला फोटो इन्स्टाग्रामने काढून टाकला. त्यावर कावकाव झाल्यावर असा फोटो एरवी पॉर्नशी संबंधित असतो म्हणून तो मान्य नसतो. मात्र हा फोटो त्या प्रकारचा नाही असे सांगत त्यांनी लोकाग्रहास्तव आपले धोरण बदलले आणि तो फोटो पुनर्स्थापित केला. म्हणजे एखाद्या गोष्टीचा बाजार करायचा झाला की काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

तिकडे अमेरिकेत अशा प्रकारांना केवळ अतिजाड व्यक्तीची अभिव्यक्ती असेच नव्हे; तर एका (सदैव अन्याय होत असलेल्या) कृष्णवर्णीय महिलेची अभिव्यक्ती असे म्हणणारे दिसले. गंमत म्हणजे अशा जाड-अतिजाड महिलांचा उल्लेख नव्या पद्धतीने ‘प्लस साइझ्ड’ वुमन असा सर्रास केला जातो आणि तो मात्र सध्या तरी कोणाच्या संवेदनशीलतेला खटकत नाही.

आता याचेच लोण काहीजण आपल्याकडे घेऊन आले आहेत. निव्वळ कॉपीकॅट. वनिता खरात या मराठी अभिनेत्रीकडून न्यूड शूट करून घेण्यात आले. त्याला अभिव्यक्तीचा मुलामा देण्यात आला. या अभिनेत्रीने कबीर नावाच्या महाभयानक चित्रपटात काम केलेले असल्याचे कळले. कलाकारांना आपल्या करियरपुढे दर्जाशी घेणेदेणे नसते हे तर आपण अतिशय सुमार टीव्ही मालिका, हास्यकार्यक्रम व चित्रपटांमधून पहात असतोच. तसाच हा प्रकार.

तर या मॅडमना वाटले की त्या या चित्रपटातील मोलकरणीचीच भूमिका मिळण्याच्या योग्यतेच्या आहेत का? इमेजब्रेक होईल असे काही तरी मला करायचे होते आणि ही ‘संधी’ माझ्याकडे चालून आल्यावर मी क्षणभरही विचार न करता मी ती स्विकारली असे या अभिनेत्रीने म्हटल्याचे ऐकले. ‘नंतर मला माझ्यातील टॅलंटचा, माझ्यातील प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. कारण मी ‘मी’ आहे’ अशी डायलॉगबाजीवजा पोस्ट तिने केल्याचेही वाचले.

यावर एका दिव्य व्यक्तीला यात थेट जिजामाता, जोतिराव-सावित्री, अहिल्यादेवी, रमाई वगैरेंना आणावेसे वाटले. असेही धन्य लोक असतात. वास्तविक या अभिनेत्रीला असे काही तरी ‘बोल्ड’ करण्यामुळे आता वैविध्यपूर्ण भूमिका मिळू शकतील या पलीकडे या नौटंकीला फार काही अर्थ नाही. कारण या कृत्यात ती म्हणते त्यातील आत्मविश्वासापलीकडे टॅलंट-प्रतिभा व मी-‘मी’ असल्याचा काहीही संबंध नाही. शिवाय समाजाच्या सौंदर्याच्या कल्पनांमध्ये बदल करण्यासाठी हा प्रयोग करायचा आहे असे तिला सांगितले गेले, असे ती म्हणाली.

सामान्यपणे चेहर्‍यावरील आत्मविश्वास आणि एकूणच ‘दिसणारे’ उत्तम आरोग्य ही सौंदर्याची नवी व्याख्या असल्याचे सांगितले जाते. त्यात कपडे उतरवण्याचा भाग कोठून येतो हे काही ही मंडळी कधी सांगताना दिसत नाही. त्यामुळे काहीतरी विचित्र करायचे; कोणी चित्रविचित्र पोषाख करते तसेच कधीतरी काहीच घालायचे नाही अशी कल्पना यामागे असावी असे दिसते.

त्याला मुलामा मात्र द्यायचा तो सौंदर्यविषयक कल्पना दुरूस्त करण्याचा. याचेच आणखी एक उदाहरण द्यायचे तर बॉडी पॉझिटिव्ह राहण्याच्या नावाखाली शरीर ओघळलेल्या व हातात पतंग असलेल्या-नसलेल्या अवस्थेतील पुरूषांच्या फोटोंचे कॅलेंडर काढले तर त्याला बाजारात कितपत उठाव असेल? भाऊ लोकहो, अगदी एब्सची अपेक्षा नाही, पण किमान सूर्यनमस्कार घाला, ते पाण्याप्रमाणे पहावे तिकडे वाहणारे शरीर नियंत्रणात आणा, असा सल्ला दिला जाईल.

एरवी महिलांना सेक्सचे ऑब्जेक्ट समजले जाते असेच नाही तर प्रत्यक्षात वापरलेही जाते हे काही गुपित नाही. स्त्रीवाद आणि असे ऑब्जेक्टिफिकेशन यातला अंतर्विरोधही लपलेला नाही. वर म्हटले तसे दर्जासाठी नाही, तर हे अनेकदा पोटापाण्यासाठी केले जाते. मात्र यामागचा हेतु पाहता महिलांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषण होते असेही म्हटले जाते. आताही सदर छायाचित्र गुणात्मकदृष्ट्या कसे उत्तम आहे, हे सांगितले जाईल.

मात्र केवळ छायाचित्राच्याच गुणात्मकतेचा विचार करायचा, तर मग या अभिनेत्रीचे टॅलंट-प्रतिभा-मी-‘मी’ असण्याचा दावा वा सौंदर्याचे परिमाण बदलणे हा भाग कोठे येतो, हे काही ही मंडळी सांगणार नाहीत. त्यामुळे या प्रकाराचे कौतुक-समर्थन करणारी मंडळी भविष्यात स्त्रीचे ऑब्जेक्टिफिकेशन करण्यावरून जेव्हा बोलतील त्यावेळी त्यांना याचे स्मरण राहू दे म्हणजे झाले.

कधी झिरो फिगरची, तर कधी बॉडी पॉझिटिव्हचीच नौटंकी का येते; ‘स्टे हेल्दी’ म्हणजे ‘आरोग्यपूर्ण रहा’, या व अशा संदेशांची मोहिम का मूळ धरत नसावी? तसा संदेश दिला गेल्यास जगातील कोणकोणत्या लॉबी संकटात येऊ शकतील, याचा थोडा विचार केला तरी या नवनव्या फॅडच्या ठराविक प्रकारांमागचे खरे कारण लगेच कळू शकते, वर उल्लेख केलेल्यातले काही फोटो देत आहे.

या सार्‍या महिलाच आहेत, याला अर्थातच मी जबाबदार नाही. वर दिलेली कारणे पाहता झिरो फिगर किंवा ओघळळेले, संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले शरीर सुंदर असू शकत नाही हे कळले तरी पुरे. बाकी या लोकांना जी डायलॉगबाजी करत रहायची ती करत राहू दे.

– राजेश कुलकर्णी, पुणे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here