मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी कायदा हातात घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यास अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे घडली आहे.
भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.
त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण आता मुद्याची लढाई पार गुद्यावर आली आहे.
पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंड काळे करून मारहाण केली आणि चक्क त्यांची धिंड देखील काढल्याची बातमी समोर आली आहे.
शिवसैनिकांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेतल्याने भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले असून शिवसेनेकडून केल्या गेलेल्या या कृत्याचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे.
-
काय आहे प्रकरण ?
-
वीज बिल आंदोलन करताना पंढरपूर भाजप माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले तसेच विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी ते पश्चिम द्वारापर्यंत कटेकर यांची अक्षरश: धिंड काढल्याचे देखील समोर येत आहे. शिवसैनिकांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य केल्यामुळे सत्ताधारी पक्ष देखील सत्तेचा गैरवापर करण्यात कमी नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
राम कदम यांनी शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ?
राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग, सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते, तसंच, हे सगळे ठरवून होत आहे का?
निद्रिस्त अवस्थेत असलेला महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे.