नागपुरातील वृद्धाला ‘फेसबूक फ्रेंडशिप महागात’ पडली | लंंडनमधील गर्लफ्रेंडचा 10 लाखांना गंडा

173

नागपूर : फेसबुकच्या माध्यमातून लंडनच्या एक कथित मैत्रिणीने नागपूरातील एका 66 वर्षीय वृद्ध व्यक्तीला लाखोंचा गंडा घातला आहे. 

कस्टम ड्युटीच्या नावाखाली सेवानिवृत्त वृद्धाचे 10 लाख रुपये या मैत्रिण आणि तिच्या टोळीने लंपास केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

नागपूरमधील 66 वर्षांच्या वृद्धाची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर लिडा थॉमसन नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले.

लिडाने तिचे लंडनमधील अनेक नामांकित ठिकाणांवरचे फोटो दाखवून नागपुरातील या वृद्ध व्यक्तीला भुरळ घातली. लॉकडाऊनच्या काळात अचानक एक दिवशी लिडाने ती भारतात येऊन आपल्याकडील कोट्यवधी रुपयांनी भारतात सेवा कार्य करू इच्छिते असं सांगितले.

नागपुरातील या वृद्ध मित्रानेही तिला होकार दिला. अचानक एकेदिवशी लिडाचा पुन्हा फोन आला आणि ती दिल्ली एयरपोर्टवर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याची थाप मारली.

तिच्याकडे भारतात सेवा कार्यासाठी आणलेले 2 कोटी रुपये असल्याने तिला कस्टमवाले 10 लाख कस्टम ड्युटी भरल्याशिवाय बाहेर निघू देत नाही आहे, असं लिडाने सांगितले.

सोबतच फोनवरून बनावट एयरलाईनचे अधिकारी आणि बनावट कस्टम अधिकारी यांच्याशी बोलणे करून दिले. आपल्या मैत्रिणीच्या आकर्षणात पुरते अडकलेले वृद्ध या जाळ्यात अडकले.

त्यांनी 9 लाख 66 हजार रुपए लिडाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले. त्यांनतर लिडा बेपत्ता झाली आणि एयरलाईन व कस्टम अधिकारीही बेपत्ता झाले.

अनेक आठवडे लिडाची वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने काल बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी लिडा आणि सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात वृद्धासोबत बोलणारी महिला कधीच लंडनमधून बोलत नव्हती.

‘ती’ लंडनवाली गर्लफ्रेंड दिल्लीतूनच बोलत होती, असं समोर आले आहे. वृद्ध, सेवानिवृत्त, महिला, विद्यार्थी असे घटक या भामट्यांचे टार्गेट असतात, त्यामुळे त्यांनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here