नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या निषेधाचा सूर अनेकांनी काढला आहे.
यशवंत मनोहर यांचा धर्म आणि त्यांच्या वैचारिक धारणेविषयी फारशी माहिती नसलेली मंडळी माध्यमातून अनावश्यक टिका करीत आहेत.
विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार स्वीकारण्याचे नाकारत व्यासपिठावर सरस्वतीची प्रतिमा आहे हे कारण यशवंत मनोहर यांनी दिलेले आहे.
सरस्वती ही हिंदू देवादिकांमधील बुद्धी वा विद्येची देवता मानली जाते. तिच्या प्रतिमेला विरोध करीत यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारल्याचे चित्र आहे.
सरस्वतीला विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध, देवाधर्माला विरोध असा डंगोरा पिटून यशवंत मनोहर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आहे.
पण या वादाला फोडणी घालण्याचे काम विदर्भ साहित्य संघाने आपल्या दुर्लक्षित कार्यपद्धतीतून केले हे अगोदर लक्षात घ्यावे. यशवंत मनोहर प्रारंभापासून स्वतःला बौद्ध म्हणून घेतात. ते बुद्धाचे निस्सीम अनुयायी आहेत.
त्यांचे लिखाणही बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर विस्तारलेले आहे. बहुतांश पुस्तकांची नावे वा लेखनाचे शिर्षक तेच दर्शवतात.
हे सर्व नीटपणे लक्षात घेतले तर यशवंत मनोहर यांना पुरस्कार देताना विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सावध व्हायला हवे होते.
बौध्द धर्म हा वेदप्रामाण्यावर विश्वास ठेवत नाही. बौद्ध धर्म स्थापना शाक्यकुलोत्पन्न गौतम बुध्दाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी सारनाथ (वाराणसी जवळ) केली.
त्यानंतर हा धर्म भारत व भारताबाहेर विस्तारला. बुध्द स्वत: मूर्तिपूजेचे विरोधक होते. ईश्वर नावाचे इतर काही अस्तित्वात आहे हेच बुद्धाला मान्य नव्हते.
बुद्ध म्हणत, “तुम्ही स्वत:चे दीपक स्वत:च व्हा, आणि स्वत:लाच शरण जा.” त्यामुळे त्यांच्या वैचारिक धारणेत प्रतिमेला व तिच्या पूजेला स्थान नव्हते.
यशवंत मनोहर याच विचारधारेचे अनुयायी आहेत. जी मंडळी आज यशवंत मनोहर यांच्या देवी प्रतिमा नाकारण्याच्या भूमिकेवर टीका करीत आहे, त्यांनी अगोदर बौद्ध असणे म्हणजे काय असते ? हे समजून घ्यावे.
कागदोपत्री लाभासाठी बौद्ध धर्माचे प्रमाणपत्र दाखवणारे आणि येथून तेथून सर्व हिंदू धार्मिक परंपरांचे पालन किंवा अनुकरण करणारे संधी साधू अवतीभवती आहेत. अशा मंडळीत यशवंत मनोहर नाहीत.
यशवंत मनोहर यांनी सरस्वतीची प्रतिमा का नाकारली ? या मागील सर्वच कारणे जाणून घ्यायची तर डॉ. यशवंत मनोहर यांचे ‘अभिनव बौद्ध आचार प्रणाली’ हे सन २००७ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक वाचायला हवे.
आजपासून तब्बल १३ वर्षांपूर्वी यशवंत मनोहर यांनी बौद्ध धर्माच्या आचरणाविषयी अत्यंत सविस्तर विवेचन पुस्तकात केले आहे. विदर्भ साहित्य संघाने हे पुस्तकच पाहिलेले नसावे.
या पुस्तकात प्रस्तावने ऐवजी ‘कळकळीचे आवाहन’ यशवंत मनोहर यांनी केले आहे. या आवाहनात ते म्हणतात, “१९५६ पासून आपण बौद्ध झालो आहोत.
त्यामुळे आपले आचरण हे बुद्धिवादी असावे कारण आपण धम्माचे उपासक आहोत.” याच कळकळीच्या आवाहनात यशवंत मनोहर म्हणतात, “आपण देवच मानत नाही.
त्यामुळे आपल्या जीवनातील कोणत्याही प्रसंगी देवाची पूजा करण्याचा प्रसंगच निर्माण होत नाही.” हे आवाहन दि. १४ एप्रिल २००७ ला केलेले आहे.
या पुस्तकात डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धर्म पालनाविषयी ३१ प्रकरणे यशवंत मनोहर यांनी लिहिलेली आहेत.
देवादिके नाकारत, हिंदुंचे सण-वार नाकारत, लग्न-मृताचे कर्मकांड, विधी नाकारत एवढेच नव्हे तर हिंदू धर्माच्या प्रभावाची मुला-मुलींची नावे नाकारत यशवंत मनोहर यांनी बौद्ध धर्मियांनी काय करावे याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अवघ्या ४५ पानांच्या या पूस्तकातून यशवंत मनोहर यांची वैचारिक धारणा स्पष्ट होते. वरील विचारधारेनुसार यशवंत मनोहर पुरस्कार नाकारताना म्हणाले, “माझी इहवादी भूमिका, तसेच माझी लेखक म्हणून असलेली भूमिका याची साहित्य संघाला कल्पना असेल असे मला वाटले होते. तथा तसा माझा समज होता.
परंतु कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय काय असेल? असे मी जेव्हा आयोजकांना विचारले त्यावेळी त्यांनी सरस्वतीची प्रतिमा मंचावर असेल, असे त्यांनी मला सांगितलं.
त्याक्षणी मी त्यांना माझी मूल्य नाकारुन हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही, असे सांगितले. तसेच मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचे आयोजकांना कळवले.”
विदर्भ साहित्य संघाने निर्माण केलेला घोळ हा असा आहे. ज्या साहित्यिकाची पुरस्कारासाठी निवड केली, त्याची वैचारिक धारणा जपणे हे सुद्धा संघाचीच जबाबदारी आहे.
सरस्वतीच्या मूर्तीचा मुद्दा हा अगोदर पत्रापत्री करून निस्तरता आला असता. असो यशवंत मनोहर यांच्या विचारधारेचा मी व्यक्तिशः सन्मान करतो. त्यांनी सरस्वती प्रतिमेविषयी मांडलेले मत हे त्यांच्या आजवरच्या विचारधारेला अनुसरूनच आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही.
(टीप – मी हिंदू आहे. सरस्वतीचा उपासक आहे. हिंदी भाषिक असून माय मराठीने मला लेखनाचे बळ दिले. यशवंत मनोहर यांचे बाजूने ४ शब्द लेखनाचा हा संस्कारही सरस्वतीचा. आमच्या बहिणाबाईने म्हणूनच मराठीला माझी माय सरोस्वती म्हटले आहे.)
-
दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार, जळगाव