आर्मी बेसजवळ वावरणारा भाजी विक्रेता पाकिस्तानी ISI चा एजंट निघाला !

132
हबीबूर रहमान

राजस्थानच्या पोखरणमधील आर्मी बेसजवळ एक धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त पीटीआयने दिले.

पोखरणच्या आर्मी बेसपाशी भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा एक तरूण हा चक्क पाकिस्तानच्या ISI चा एजंट असल्याची माहिती मिळाली असून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हबीबूर रहमान असं या व्यक्तीचं नाव आहे. भारतातील गोपनीय माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे व कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली.

रहमान याआधीदेखील ISI साठी काम करत होता आणि तो पाकिस्तानला जाऊन आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

रहमानकडून काही गोपनीय कागदपत्रे आणि भारतीय लष्कराच्या योजनांच्या संबंधित काही नकाशे ताब्यात घेण्यात आले.

हबीबूर रहमानच्या सांगण्यानुसार, ही गोपनीय माहिती व कागदपत्रे त्याला आग्रा येथे लष्करी सेवेत असलेल्या परमजीत कौरने दिली.

त्यानुसार आता दिल्ली पोलिस हबीबूरची तर लष्करी अधिकारी परमजीत कौरची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर परमजीतला पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.

रहमान ही गोपनीय कागदपत्रे कमाल नावाच्या माणसाला देणार होता अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोखरण परिसरातून अनेक संशयितांची धरपकड दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे.

तसेच, हा प्रकार म्हणजे एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग असू शकतो असा संशय पोलिसांनी आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की रहमान भाजी विक्रेता म्हणून पोखरण आर्मी बेसच्या आसपास रहात होता.

त्याला काही वर्षांपासून आर्मी बेसमध्ये भाजी पोहोचवण्याचे कंत्राटदेखील देण्यात आले होते. इंटेलिजन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रहमानला ताब्यात घेण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here