मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा नंबर धनंजय मुंडे यांचा लागणार का? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून होऊ लागली असून धनंजय मुंडे यांच्या भगिनी व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीच आज या मागणी केली आहे.
संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांचा राजीनामा घेतला गेला यात आम्हाला पडायचे नसून राठोड आता मंत्रिपदावर नाहीत ही महत्त्वाची बाब आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्याही
राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी आमची मागणी असून मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष ठेवावे, ही अपेक्षा असल्याचे पंकजा यांनी नमूद केले.
त्यानंतर पंकजा यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसाच करुणा शर्मा आणि रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पुन्हा एकदा पंकजा यांनी केली.
धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही पंकजा यांनी केले.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आमचा पक्ष सातत्याने करत असून माझेही तेच मत असल्याचेही पंकजा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या.
पोलीस यंत्रणांवरील दबावाकडे बोट दाखवत पंकजा यांनी यावेळी महत्त्वाची मागणी केली. राजकारणात वावरत असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी यंत्रणा असायला हवी, तशी स्पष्ट गरज सध्या दिसत आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर पंकजा यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.
सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दूरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही’, असे त्यांनी नमूद केले होते.