मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय ‘गंभीर’ आरोप करणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्राने एकदम राज्याचे वातावरण तापले आहे.
परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे. या पत्रात केलेल्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
दरम्यान, आपल्यावरील हे ‘आरोप’ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळले आहेत. यासंदर्भात देशमुख यांनी ट्विट केले असून परमबीर सिंग यांच्यावर टीकात्मक भाष्य केले आहे.
परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
– ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
गृहमंत्री देशमुख म्हणाले, “परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून बचावासाठी माझ्यावर हा खोटा आरोप केला आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना त्यांनी हे आरोप केले आहेत.”
परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होते.
मुंबईत साधारण १,७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून २ ते ३ लाख रुपये वसूल केले तरी महिन्याकाठी ४० ते ५० लाखांचं टार्गेट सहज शक्य आहे, असंही देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं होतं.
यानंतर वाझे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून मी देखील शॉक झालो, असंही परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.