परभणीचे भुमिपुत्र ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे (DCGI) संचालक डॉ. वेणुगोपाल सोमानी यांनी देशात 2 कोरोना लसींना परवानगी दिली

188

परभणी : ‘जगात जर्मनी अन् भारतात परभणी’ ही परभणीबाबत प्रचलित असलेली म्हण अनेक बाबींनी सिद्ध झाली आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा देशाला आला.

देशात कोरोनावरील दोन लसींना परवानगीच परभणीच्या भूमीपुत्राने दिली आहे. अर्थात ही परवानगी देणारे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक डॉ. वेणुगोपाल सोमानी हे परभणीचे भूमिपुत्र आहेत.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सोमानी कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. वेणुगोपाल सोमानी यांनी त्यांचे शिक्षण हे बोरी येथील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू केले.

दहावीपर्यंत त्यांनी बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर बारावीला नांदेड येथे प्रवेश घेऊन बारावीनंतर त्यांनी गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज ऑफ नागपूर येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नागपूर विद्यापीठातून पीएचडी पुर्ण करून थेट दिल्ली गाठली. तिथे युपीएससी पास करून डिसीजीआयचे संचालक झाले. काल त्यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन कोविशील्ड आणि कोवॅक्सीनला परवानगी दिली.

ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. जिल्हा परिषदेचा विद्यार्थी ते थेट ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया पर्यंत डॉ. वेणुगोपाल सोमानी यांचा प्रवास अतिशय खडतर होता.

सोमानी कुटुंबच मुळचे बोरी येथील. डॉ. वेणुगोपाल सोमानी यांचे आजोबा दिवंगत शंकरलाल सोमानी हे या पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत व्यापारी होते.

डॉ. वेणुगोपाल यांचे वडील आणि काका हे दोघेही स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी डॉ. वेणुगोपाल आणि त्यांचे 2 बंधू मनोज सोमानी आणि विजय सोमानी यांनाही उच्च शिक्षण दिले आहे.

मात्र, डॉ. वेणुगोपाल हे मुळातच अभ्यासू होते. त्यांना लहानपणापासूनच औषध निर्माण आणि संशोधन क्षेत्राचे आकर्षण होते. त्यातच त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले करिअर केले आहे.

एकूणच डॉ. वेणुगोपाल सोमानी हे परभणीचे असल्याची माहिती आज अनेकांना झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

त्यांचे जन्मगाव बोरीच नाही तर संपुर्ण जिल्ह्यासाठी त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. मुलाच्या यशाने अभिमानाने मान उंचावलीय अशी प्रतिक्रिया डॉ. वेणुगोपाल यांच्या आईवडिलांनी दिली आहे.

लहानपणापासून त्यांना औषध संशोधनाची होती आवड

डॉ. वेणुगोपाल सोमानी यांना लहानपणापासूनच औषध संशोधनात करिअर करण्याची आवड होती. त्याच अनुषंगाने त्यांनी पुढे अभ्यास केला आणि शेवटी युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या क्षेत्रातच करिअर केले.

स्टडीज इन प्रॉग्लंड रिलीज फॉरमुलेशन अँड स्टॅबलीटी अँड बायो अव्हेलेबिलीटरी स्टडीज विथ ब्रोमहगजिन हायड्रोक्लोराईड या विषयावरील शोध निबंधास त्यांना नागपूर विद्यापीठाने पीएचडी प्रदान केलेली आहे.

डॉ. वेणुगोपाल गिरीधारीलाल सोमानी

 • ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक.
 • काम : धोरण तयार करणे, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया, नियामक प्रक्रियेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणे.
 • जन्म: 26/10/1968
 • वय: 53 वर्ष
 • जन्मगाव: बोरी, जिल्हा परभणी
 • शिक्षण : एम.फार्म पीएचडी
 • पहिली ते दहावी- बोरी जिल्हा परिषद शाळा
 • बारावी- सायन्स कॉलेज नांदेड येथे
 • एम फार्म – शासकीय फार्मसी कॉलेज नागपुर
 • पीएचडी – नागपूर विद्यापीठ
 • युपीएससी पुर्ण करून ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सुरुवात. नंतर थेट ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here