अहमदपूर : कोरोना नियमभंग केला म्हणून त्रिपुरा येथील लग्न मंडपात गोंधळ घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रात कोरोना नियमांना हरताळ फासल्याची घटना समोर आली आहे.
एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
सामान्य माणूस व व्यापारी देशोधडीला लागला आहे. व्यापारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला वैतागून गेले आहेत. तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे.
कोरोना काळात नगर पंचायत कर्मचारी हे सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत याची शहानिशा करावी म्हणून गावकरी तेथे गेले. त्यावेळी हॉटेलच्या आतील खोलीत हे सर्व कर्मचारी मद्यपान करताना आणि मटन खाताना आढळून आले.
अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती. चाकूर शहराच्या बाहेरील एक हॉटेलमध्ये ही पार्टी सुरु होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.
या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
काही तरुण मुलांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. यावेळी तेथील कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. काही वेळात हे व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामस्थानी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीदार शिवानंद बिडवे यांच्याकडे केली आहे. यातील दोषी लोकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयस प्राप्त झाले आहे.
चाकूर नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याशी पत्र व्यवहार करून यातील सत्य काय आहे याची चौकशी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
संबंधित अधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली आहे.