लातूर : जिल्हयात कोरोणा रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत झपाटयाने वाढत आहे.
लातूर मधील दोन्ही मेडिकल कॉलेज, खाजगी रुग्णालय पूर्णपणे भरली असून एक ही बेड रिकामा नाही.
त्यात भर म्हणून जिल्हाभरातून अत्यवस्थ रुग्ण लातुराकडे पाठवले जात आहे. दुहेरी संकट असे की, कोरोनाचा काळ संपला असे गृहीत धरुन इंजेक्शन रेमडिसिवीर उत्पादन डिसेंबर जानेवारीमध्ये थांबवण्यात आले होते.
यावेळेला कोरोनाची साथ दुप्पट वेगाने पसरत आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणेच आपल्याला रुग्णांची देखभाल करावी लागते.
त्यामुळे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊन गरज नसताना इंजेक्शनची मागणी करु नये आणि इकडून तिकडे पळापळ करु नये, डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार करावेत.
कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आला तरी घाबरू नका. कोरोना उपचारासाठी पूर्ण टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्ण व नातेवाईकांनी संयम पाळावा, असे आवाहन आयएमएच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा काळे यांनी केले आहे.
शासनाला या उपचाराचा सल्ला देणारे कोविड टास्क फोर्स असते ते अतिशय अनुभवी व तज्ञ डॉक्टरांनी बनवलेले असते. आपणास टी. व्ही. वर्तमानपत्रे सगळीकडे या इंजेक्शनची मागणी वाढली व पुरवठा कमी होत असल्याने निर्माण झालेला ताण ऐकतच असाल. त्यामुळे परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे. हे लक्षात घेऊन आपण संयमाने वागले पाहिजे, हा आपल्या सर्वांच्या कसोटीचा काळ आहे.
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दोन्ही कॉलेजचे अधिष्ठाता सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.
या इंजेक्शनच्या वापरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी फक्त आपल्या घरातून बाहेर पडू नये, हात धूत राहणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे या गोष्टीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
आयएमए ही संघटना या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. आम्हा सर्वांना आपल्या जीवाची काळजी आहे. ही वेळ एकमेकांना दोष देण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याची आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर, कमिशनर व डॉक्टर सक्षम आहेत. आपण त्यांना साथ देऊया आणि कोरोनाची लढाई जिंकू या!