नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Coronavirus New Strain) उद्भवल्यानंतर लोकांच्या मनात कोरोना विषाणूबद्दलची भीती आणखीच गडद झाली आहे.
आता या नवीन कोरोना विषाणूचे रुग्ण भारतातही सापडू लागले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोना विषाणूची एक दहशत निर्माण झाली आहे.
लोकांच्या याच भीतीचा फायदा आता सायबर ठग उठवत आहे. कोरोना विषाणूच्या लसीकरणासाठी नोंदणी करून घेण्याच्या नावाखाली लोकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे.
मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी कोरोना लसीकरणाच्या नावाखाली ऑनलाइन पद्धतीनं गंडा घातल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.
त्यामुळं राज्य पोलिसांच्या सायबर सेलनं लोकांना माहिती देवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर सेलनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीकरण नोंदणीच्या नावाखाली फरीदाबाद येथे अर्धा डझनहून अधिक लोकांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे.
ज्यामध्ये ठग लोकांना फोन करून कोरोना विषाणूच्या लसीसाठी नोंदणी करण्याचा किंवा लस विक्री करण्याचा दावा करीत आहेत.
केरळमध्येही अशी काही प्रकरणं उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधून ठग लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत.
असे जाळ्यात अडकवतात
हे भामटे लोकांना फोन करून कोरोना विषाणूबद्दलची भीती दाखवतात. कोरोना लसीकरणासाठी तुमचा नंबर सर्वात उशीरा येऊ शकतो. तोपर्यंत तुम्हाला नव्या कोरोना विषाणूची लागण होऊ शकते.
त्यामुळे तुमच्या कुटुंबियांची आणि तुमची त्वरित काळजी घ्या. याठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यास तुमचा कोरोना लसीकरणासाठीचा नंबर सुरुवातीला येऊ शकतो.
ही नोंदणी करण्यासाठीहे ठग लोकांकडून आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर मागवून घेतात. त्यानंतर संबंधीत व्यक्तीच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. हा ओटीपी नंबर ठगांना सांगितल्यानंतर पुढच्या क्षणातच तुमचं अकाऊंट रिकामं होतं.
सावध रहा आणि असा बचाव करा
अशा प्रकारच्या फसवणुकीला व्हॅक्सिन फिशिंग फ्रॉड म्हटलं जातं. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन सायबर चोरटे लोकांना लुटत आहेत.
त्यामुळे तुम्हाला अशाप्रकारच्या अज्ञात फोन आला तर त्यांना तुमचा आधारक्रमांक आणि मोबाइल नंबर सांगू नका. कारण या माहितीच्या आधारे चोरटे तुमच्या बॅक अकाऊंटमधून पैसे काढून घेतात.
ते बर्याच वेळा तुमची वैयक्तिक माहितीदेखील विचारतात. परंतु अशावेळी सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारच्या लोभाला बळी पडू नका.
तुमच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नका. तसेच जर असा प्रकार तुमच्यासोबत घडला तर त्वरित सायबर सेलकडे याबाबत तक्रार करा.