सिंधुदुर्ग : शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झाले आहे.
शिवसेनेला आता आपला जनाधार परत हवा आहे, त्यासाठी हे केविलवाणे प्रयत्न सुरु आहेत. त्यांची व्होट बँक पूर्णपणे घसरली आहे, त्याला वाचविण्याची हि धडपड आहे.
शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे, पण जनतेला सेनेचे ‘हिंदुत्व’ कळून चुकले आहे अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने केलेल्या गेल्या पाच वर्षांतील अविकसित कामगिरीवर मुंबईकर जनता नाराज आहे. त्यामुळे त्यांना सर्व मुंबईकर धडा शिकवतील.
राज्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावरुनही शेलार यांनी टीका केली. आशिष शेलार म्हणाले की, पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे. याच भूमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी, अशी आमची इच्छा नाही.
मात्र ज्या पद्धतीने भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचं वर्णन करायचं तर हतबल आणि सूडबुद्धीने सरकारने घेतलेला हा निर्णय आहे.
या सरकारची मानसिकता हळूहळू असुरक्षित होऊ लागली आहे. हे सरकार असुरक्षित मनोवृत्तीतून काम करीत आहे. त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हा निर्णय कोणत्याही माहितीवर आधारित घेता राजकीय दृष्टीकोणातून व राजकीय आकसातून घेण्यात आला आहे, कदाचित सरकार सूड घेऊ इच्छित असेल असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
शिवसेनेसोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे का? असा सवाल केला आहे.
“शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे.
मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय. भाजपला मुंबईचं विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत.
मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि त्याला मुक संमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता त्यांना स्विकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल. असा इशाराही आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना दिला आहे.