संपूर्ण युकेमध्ये पुढील आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : व्यापक वापरासाठी फायझर-बायोएनटेक (Pfizer/BioNTech) कोरोना व्हायरस लस मंजूर करणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे.
अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे. ब्रिटन सरकारने असे म्हटले आहे की, स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सी ‘एमएचआरए’ची शिफारस स्वीकार करत सरकारने फायझर-बायोएनटेक च्या कोव्हिड-19 (COVID-19) व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे.
MHRA ने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, कोव्हिड-19 बाबत 95 टक्के सुरक्षा देणारी ही लस पुढील आठवड्यात रोलआउट करणं सुरक्षित आहे.
केअर होममधील वृद्ध नागरिकांना लशीची जास्त गरज आहे, अशा ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यासाठी लसीकरण काही दिवसातच सुरू होऊ शकतं.
दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देखील या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून असं म्हटलं आहे की, ‘हे विलक्षण आहे की,कोव्हिड -19 साठी एमएचआरएने औपचारिकपणे फायझर-बायोएनटेकचे व्हॅक्सिन अधिकृत केले आहे.
पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण युकेमध्ये उपलब्ध करण्यास सुरवात होईल.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी यापूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की ही लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल.
एमएचआरएने फायझर-बायोएनटेक कोरोना विषाणूच्या लशीचे मूल्यांकन केले आहे आणि लशीला मान्यता देण्यात आली आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेकाच्या लशीमध्ये सुरक्षिततेच्या निकषांची पूर्तता केली जाते की नाही हेदेखील ठरविण्याच्या प्रक्रियेत ही एजन्सी कार्यरत आहे.
युकेमधील मंत्री नादिम जहावी यांच्या हवाल्याने एका मीडिया अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, जर सर्व काही योजनेनुसार झाले आणि फायझर-बायोएनटेक यांनी विकसित केलेल्या लशीला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली तर काही तासांत ही लस वितरीत केली जाईल आणि लसीकरण केले जाईल.
तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE
पुढच्या वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2020 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे.
भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल.
सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.
लशीची नेमकी किंमत ठरली नाही
CNBC आवाजाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लशीची नेमकी किंमत ठरली नाही. मात्र एका डोसची किंमत 210 रुपये असेल त्यामुळे दोन डोससाठी 420 रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
मोठ्या संख्येनं लशीकरण करण्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च येईल. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला कोरोना लशीवर सरकारचे 18 हजार कोटी रुपये खर्च होऊ शकतात.