पोलिस अधिकारी सचिन वाझेंची बदली | गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

186
Anil Deshmukh

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.

मात्र, त्यांच्या अटकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ठाम राहिले. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

राज्य सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, सचिन वाझेंना अटक करावी, अशी मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन गदारोळ झाला.

विधानपरिषदेचे कामकाज थोडया वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आले. सचिन वाझेंचे निलंबन करून अटक करावी, अश मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. वाझेंच्या बदलीबाबत आम्ही समाधानी नाही. निलंबन होईपर्यंत अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सभागृहाबाहेर एकनाथ शिंदे म्हणाले, हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करत आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. चौकशीशिवाय कारवाई करणं अन्यायकारक राहील.

सभागृहाबाहेर गृहमंत्री अनिल देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएस ही अतिशय चांगल्या पध्दतीने करत आहे. दोषींवर कडक कारवाई होईल.

मोहन डेलकर यांच्या मुंबईतील आत्महत्याबाबत त्यांच्या मुलगा अभिनव डेलकर यांच्या तक्रारीनुसार मरिन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here